आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ गोळीबारप्रकरणी दिले चौकशीचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पॅराडाइज कॉलनी येथे झालेल्या ‘त्या’ गोळीबारप्रकरणी पोलिस उपायुक्त संजीव लाटकर चौकशी करणार आहेत. पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी चौकशी व अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दोन गटांतील वादानंतर रविवारी (दि. 19) रात्री पॅराडाइज कॉलनीत गोळी चालल्याची जोरदार चर्चा शहरात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडगेनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. परंतु, कोणताही ठोस पुरावा किंवा भांडण करणारे हाती न लागल्याने रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद नव्हती. रविवारी रात्री उशिरा दोन गटांत वाद झाला. हा वाद एका मुलीच्या कारणावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर एका गटातील सदस्याने गोळी झाडल्याचा आवाज काहींनी ऐकला. ज्याने पोलिसांना माहिती दिली, ती व्यक्तीदेखील हाती न लागल्याने पोलिस पथक ठाण्यात परतले. सोमवारी रात्री पोलिसांनी काही युवकांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीअंती त्यांना सोडण्यात आले. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

एटीएम कार्ड वापरून पंधरा हजारांचा गंडा
हरवलेले एटीएम कार्ड वापरून अज्ञात चोरट्याने बँक खात्यातून पंधरा हजारांची रक्कम काढली.राजापेठ परिसरातील बुटी प्लॉट येथील रहिवासी दत्तात्रय राजाराम लांडगे यांचे एटीएम कार्ड आणि पिन क्रमांकाचे लिफाफा असलेले पाकीट पाच ते 25 नोव्हेंबर 2013 दरम्यान गहाळ झाले होते. त्याच्या साहाय्याने अज्ञात चोरट्याने 15,100 रुपयांची रक्कम एटीएममधून काढली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.