आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या मजल्यासह कुंपणभिंत जमीनदोस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पहिल्या मजल्यासह चार घरांची कुंपणभिंत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने जमीनदोस्त केली. सुरभी विहार आणि गुलाबबाबानगर येथे सार्वजनिक जागेवर एकूण पाच घरांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली.
उत्तर झोन अंतर्गत अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई करीत सुरभी विहार येथील भाग्यर्शी शाळेपुढील जयकुमार वरघट यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील भिंत पाडण्यात आली. त्यानंतर गुलाबबाबानगर येथील विलास दातीर, प्रशांत कडू, दिनेश देशमुख तसेच काळे यांच्या घराची कुंपणभिंत पाडण्यात आली. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या आदेशावरून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू केली आहे.
मंगळवारीदेखील (दि. 4) कलोतीनगर, उर्वशीनगर शिवरसिकनगर, तिरुपतीनगरमध्ये कारवाई करण्यात आली. कलोतीनगरातील किरण मोहोड, गोपाल उपाध्याय यांच्या अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचे गजराज चालले. शिवरसिकनगर येथील शालू काळे यांची झोपडी हटवण्यात आली. तिरुपतीनगर येथील जयमाला कुकडे यांच्या घराची कुंपणभिंत पाडण्यात आली. कठोरा नाक्यावरील अतिक्रमणातील हातगाड्या उचलण्यात आल्या.
सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या नेतृत्वात कर्मचारी, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, निरीक्षक उमेश गोलाईत, सहायक अभियंता मनोज शहाळे तसेच गाडगेनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व मनपा उत्तर झोनच्या कर्मचार्‍यांनी अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
पहिल्या टप्प्यात 20 ठिकाणे निश्चित
महानगरपालिका क्षेत्रातील 20 ठिकाणचे अतिक्रमण पहिल्या टप्पात काढले जाणार आहे. आयुक्त अरुण डोंगरे यांनी त्याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशावरून अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई आरंभ केली आहे. आणखी काही दिवस विभागाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे. महापालिकेच्या कारवाईचा धसका अनधिकृत बांधकाम करणार्‍यांनी घेतला आहे.
उत्तर झोनमध्ये दोन दिवस कारवाई
महानगरपालिकेच्या उत्तर झोनमध्येच पहिले दोन दिवस अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. गुरुवारी (दि. 6) केली जाणारी कारवाई उत्तर झोनमध्ये केली जाते किंवा अन्य भागात केली जाणार आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.