आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्य विभाग कार्यालयाची युवकांनी केली तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - तालुक्यातील उमर्डा येथील तलावाचा ठेका न दिल्याच्या कारणावरून काही जणांनी संगनमत करून मत्स्य विभागाच्या जिल्हा कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना एक जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या वेळी एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. या तोडफोडमध्ये कार्यालयातील संपूर्ण टेबलवरील काचा, खुर्च्यांची नासधूस करण्यात आली आहे. वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भात गुन्हा नोंदण्यात आला नव्हता.

यवतमाळ तालुक्यातील उमर्डा येथील तलावाचा गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात वाद होता. याची दखल घेत न्यायालयाने यवतमाळ तालुक्यातील गहुलीहेटी येथील संस्थेचे ठेकेदार संदेश राठोड यांच्या बाजूने निकाल दिला आणि उमर्डा तलावाचा ठेका गहुलीहेटी येथील संस्थेला देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने दिलेले आदेश मत्स्य विभागाने झिडकारले. विशेष म्हणजे शासन स्तरावरून नवीन अध्यादेश येईपर्यंत पूर्वीच्याच प्रकाराने तलाव द्यावा, असे निर्देश आयुक्तालयाने दिले होते. त्यात सोमवार, 30 जून रोजी तलावाची मुदत संपली होती. मंगळवार, 1 जुलै रोजी नवीन संस्थेला हा तलाव देण्याऐवजी तिवसा येथील मच्छिंद्रनाथ सहकारी संस्थेला देण्यात आला. त्यांच्याकडून तलावाच्या मोबदल्यात 8 हजार 640 रुपयांचा धनादेश स्वीकारण्यात आला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या गहुलीहेटी येथील संस्थेच्या सदस्याने सात ते आठ जणांना एकत्रित करून एक जुलै रोजी जिल्हा मत्स्य विभागाचे कार्यालय गाठले होते.

दरम्यान, कार्यालयात कुणीच नसल्याचे पाहून त्यांनी कार्यालयातील टेबलच्या काचा, खुर्च्यांची तोडफोड केली. या वेळी उपस्थित कर्मचा-याने संबंधित विभागाच्या अधिका-यांना फोनवरून संपर्क साधला आणि घटनेची माहिती त्यांना दिली. दरम्यान, सुनील चोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या समाजकल्याण विभागाच्या इमारतीत जिल्हा मत्स्य विभाग आहे. अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या या विभागात सकाळी 10.30 वाजता काही युवकांनी तोडफोड केली. या ठिकाणी कर्मचारी असताना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना माहिती दिली. तरीसुद्धा जिल्हाधिका-यांना माहिती पुरवण्यात आली नाही.
मत्स्य विभागाचा कारभार बोगस
- मत्स्य विभाग कार्यालयाच्या कारभारावर अनेक ठेकेदार त्रस्त झालेले आहेत. तलावाचा ठेका देताना पात्र संस्थेला डावलण्यात येत आहे. न्यायालयाने माझ्या संस्थेच्या बाजूने निकाल दिला आहे. या आदेशालाही केराची टोपली दाखवण्याचा प्रकार मत्स्य विभागाने केला आहे. यासंदर्भात आयुक्तालयात घेण्यात आलेल्या सुनावणीमध्येही माझ्याच बाजूने निकाल दिला. एकंदरीत जिल्हा मत्स्य विभागातील अधिकाºयांचा कारभार बोगस झाला आहे.’’
संदेश राठोड, ठेकेदार, गहुलीहेटी.

अत्यंत घृणास्पद प्रकार
तलाव वाटप करताना काही गोष्टी एखाद्याच्या विरोधात जातात, ही बाब सत्य आहे. शासकीय कार्यालयात येऊन असा प्रकार करणे घृणास्पद आहे. काही बाबी चुकीच्या असत्या, तर त्यांनी आम्हाला बोलून त्या सोडवणे आवश्यक होते. तक्रार देण्याचे निर्देश दिले आहे.’’
ला. गो. राठोड, सहायक आयुक्त मत्स्य विभाग.