आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 तासांत, 5 पोलिस आरोपीच्या पिंज-यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील २६ तासांमध्ये अमरावती पाेलिसांना विविध प्रकरणात आपल्याच सहकाऱ्यांना पकडण्याची वेळ आली. आश्चर्याची बाब म्हणजे आराेपीच्या पिंज-यात असलेल्यांमध्ये दाेन अधिकारी आणि तीन पाेलिस कर्मचा-यांचा समावेश आहे. यांच्यावरील गुन्हेही कदापि माफ करण्यासारखे नाहीत. तिघा महाभागांनी लाच घेतली एकाने चोरी केली तर एकावर चक्क विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशा महाभागांच्या हातात सामान्यांची सुरक्षा व्यवस्था होती. या घटना उघडकीस आल्यानंतर आपसुकच अमरावतीकरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, ‘पोलिसांचे हे चाललंय तरी काय?’.
नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एपीआय लक्ष्मण मारोती गवंड (३९ रा. पारूडी, ता. बारामती जि. पुणे) त्यांचेच रायटर रवींद्र दादाराव बाभुळकर (४७ रा. कृष्णार्पण कॉलनी, अमरावती) (ब. नं. ८६२) या दोघांना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कठोरा येथे दासवत यांचे शेत आहे. या शेतामध्ये विहीरीत काम करत असताना राम भीमराव नांदने (४५, रा. नांदुरा लष्करपूर) यांचा १६ जूनला पडून मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय गवंड यांच्याकडे होता.
या प्रकरणात शेतमालक दासवत यांच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो मात्र गुन्हा दाखल करणार नाही, तसेच आरोपी करणार नाही आणि प्रकरणाचा निपटारा करून टाकण्यासाठी गवंड यांचे रायटर रवींद्र बाभुळकर यांनी दासवत यांना १९ जूनला १ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम जास्त असल्यामुळे ५० हजार रुपयात तडजोड ठरली. मात्र यामध्ये आणखी दहा हजार देण्याची मागणी करून एकूण ६० हजार रुपये गवंड यांनी मागितले.
ठरल्याप्रमाणे हा व्यवहार २६ जूनला रात्री ठरला. तत्पूर्वी दासवत यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे गवंड बाभुळकर यांची तक्रार केली होती. त्यामुळे शुक्रवारी (२६ जून) रात्री लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची चमू तयारीत हाेतीच. शुक्रवारी रात्री बसस्थानक मार्गावरील सावकार अपार्टमेंटमधील दासवत यांच्या निवासस्थानी गवंड बाभूळकर पोहचले. त्यांनी दासवत यांच्याकडून ६० हजार रुपये लाच स्विकारली. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे दोन कर्मचारी त्याच भागात होते. तर उर्वरीत कर्मचारी अधिकारी दासवत यांच्या घराखाली होते.
लाचेची रक्कम घेऊन गवंड बाभ्ूळकर खाली आले असता सापळा रचून बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडले. यावेळी रंगेहातच ही कारवाई झाली आहे. लाच लुचपत विभागाने एपीआय गवंडसह रायटर पोलिस नाईक बाभुळकरला अटक केली होती. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यांसह एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
या दोघांव्यतिरीक्त गुरूवारी गुन्हे शाखेचे एपीआय गोपाल उपाध्याय यांनी ग्रामीण पोलिसात कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याला प्रा. राम मेघे महाव्यालयातील संगणक चोरी प्रकरणात ताब्यात घेऊन अटक बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर ‘मेहरबानी' करून त्याला नोटीसवर सोडले. त्या पोलिसाने चोरी केलेले संगणक त्याच ठिकाणी टाकले होते. त्याच्याकडून काहीही जप्त करायचे नव्हते. त्यामुळे त्याला नोटीस दिली आहे.
दोषारोपपत्र दाखल करतेवेळी त्याला न्यायालयात पाठवण्यात येईल, त्याचवेळी तो अहवाल ग्रामीण पोलिसांनाही पाठवण्यात येणार असल्याचे बडनेराचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी सांगितले. गुरूवारी रात्रीच शिरजगाव पोलिस ठाण्याला कार्यरत असलेल्या एका जमादाराला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यासोबतच गुरूवारी मध्यरात्री वर्धा पोलिस शहरात आले होते. त्यांनी वर्धेत कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला पकडून सोबत नेले. हा उपनिरीक्षक वर्धा जिल्ह्यातील शेलू ठाण्यात कार्यरत आहे. त्या उपनिरीक्षकाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.
अशा प्रकारे अवघ्या गुरूवार ते शुक्रवारी रात्री पर्यंत अवघ्या २६ तासात पाच पोलिस आरोपीच्या पिंजऱ्यात आलेले आहे. अशा प्रकारे पोलिसांवर झालेली कारवाई अमरावतीच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील पहीलाच प्रसंग आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सर्व घटना...
बातम्या आणखी आहेत...