आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर आपत्ती निवारणाचा मालखेड तलावात सराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पूर, वादळासारखी संकटे उभी ठाकतात. अशा संकटांशी दोन हात करण्याकरिता मालखेड तलाव येथे बचाव पथकातील सदस्यांना पूर आपत्तीमध्ये मदतकार्य करण्याचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण बुधवारी (दि. 11) देण्यात आले. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने तसेच रबर बोट चालवण्याबाबतदेखील प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिकेच्या प्रादेशिक आणीबाणी केंद्राच्या वतीने बचाव पथकातील सदस्यांना दोन दिवसांचे आपत्ती निवारणार्थ प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी स्थानिक वॉलकट कम्पाउंड स्थित अग्निशमन विभाग कार्यालयात अग्निशमन यंत्रणा, फायर एस्टिंग्विशर, कटर, विविध उपकरणे हाताळण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मालखेड तलावात दोन रबर बोटींच्या सहाय्याने पुरामध्ये बचाव कार्य कसे करावे, बोट कशी चालवावी, याबाबत होमगार्ड समादेशक एम. एच. रहमान यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीस वाचवण्याचे प्रात्यक्षिकदेखील दाखवण्यात आले. लाइफ ज्ॉकेटचा वापर कसा करावा, पुरामध्ये पाण्याच्या प्रवाहात कसे पोहावे आदी माहितीदेखील देण्यात आली. यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपयोगी येणार्‍या कटर व स्पीलर, हायड्रोलिक लिफ्टर, फायर एस्टिंग्विशर आदी उपकरणांबाबत माहिती देण्यात आली.
मालखेड येथील प्रशिक्षण कार्यक्रमाला आयुक्त अरुण डोंगरे, उपायुक्त रमेश मवासी, सहायक आयुक्त राहुल ओगले, होमगार्ड समादेशक एम. एच. रहमान, समन्वयक संदीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, डॉ. देवेंद्र गुल्हाने, डॉ. अजय जाधव, मुख्य लेखाधिकारी शैलेंद्र गोसावी, पशु शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर आदी उपस्थित होते.