आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्प प्रदर्शनात डच गुलाब, शेवंती, जरबेराच्या प्रदर्शनाने नागरिक भारावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सायंस्कोर मैदानावर थाटण्यात आलेल्या पुष्पप्रदर्शनातील डच गुलाब, शेवंती, जरबेरा, बोन्साय आणि रंगीबेरंगी कोलियास अशी विविध शोभिवंत फुलांच्या मोहामध्ये अमरावतीकर चांगलेच भारावून गेले. फुलांचा सुगंध तसेच हिरवळीमुळे पुष्पप्रदर्शनाचे दालन शनिवारी पुष्पप्रेमींनी फुलून गेले होते. अमरावती गार्डन क्लबतर्फे पुष्पप्रदर्शनात विभिन्न फुलांची सुरेख मांडणी केली आहे.

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट, शोध प्रतिष्ठान व अमरावती गार्डन क्लबतर्फे सायंस्कोर मैदानावर सांस्कृतिक व पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बचतगटांच्या उत्पादित वस्तू, ‘स्वर शोध’ गायन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. फुलांचा राजा गुलाब, शेवंतीचे आकारमानानुसार प्रकार, पॉटेड शेवंती तसेच बाउल गुलाब आदी रंगीबेरंगी तसेच आकर्षक शोभिवंत फुलांची सजावट प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे.

शेवंती कट फ्लावर, शेवंती पॉटेड, शेवंती बाउल, गुलाब कट फ्लावर, गुलाब पॉटेड, गुलाब बाउल, इतर फुलांची सजावट, धान्याची सजावट, बोन्साय, रंगीबेरंगी कोलियास, शेड लव्हिंग फोलिएज रोपटे, सन लव्हिंग फोलिएज रोपटे, हँगिंग रोपटे, सीजनल पेरिनियल, डेहलिया, शेवंतीचे बारा वर्गीकृत गट असे रंगीबेरंगी फुलांचे प्रकार येथे एकाच छताखाली पाहावयास मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बचतगटांचे 270 स्टॉल
सिद्धिविनायक महिला बचतगट महासंघातर्फे महोत्सवात बचतगटांद्वारे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन थाटले आहे. महिलांसाठी उपयोगी वस्तू मांडण्यात आल्या आहेत. 270 स्टॉल प्रदर्शनात असून, आवश्यक वस्तू स्टॉलवर माफक दरात उपलब्ध आहेत.

पुस्तक प्रदर्शनाने वेधले लक्ष
मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशनतर्फे महोत्सवात पुस्तक प्रदर्शन लावण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अब्दुल कलाम, महात्मा गांधी, अब्राहम लिंकन या थोर महापुरुषांचे आत्मचरित्र तसेच त्यांनी लिहिलेले पुस्तके, इतिहास, भूगोल, वाड्मय, साहित्यिक तसेच शैक्षणिक पुस्तकेदेखील मांडण्यात आली आहेत.

व्वा! किती सुरेख चित्र!
व्वा! किती सुरेख चित्र! एक नंबर! जबरदस्त! अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या रसिकांकडून. अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या सदस्यांनी कॅमेर्‍यातून टिपलेले अप्रतिम छायाचित्र येथे मांडण्यात आले आहेत. स्त्रीभ्रूणहत्या, बालमजुरी, अंधर्शद्धा निर्मूलन तसेच सिगारेटचे दुष्परिणाम या विषयांवरील चित्रकारांनी रेखाटलेली अप्रतिम चित्रेदेखील या दालनात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.