आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक जाळीचा दहा लाखांचा निधी जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - उड्डाणपुलावर संरक्षक कठडे लावण्यास विधान परिषदेच्या आमदार शोभा फडणवीस यांनी जाहीर केलेला दहा लाखांचा निधी परत जाणार आहे. महापालिकेने कठडे लावण्याचे काम पूर्ण केले असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपासून निधी पडून असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक जाळी लावण्यास विलंब का केला, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

दहा महिन्यांपूर्वी राजापेठ पोलिस ठाणे ते इर्विन दरम्यानच्या उड्डाणपुलावरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्यानंतर आमदार फडणवीस यांनी 19 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी अमरावतीतील पुलाला संरक्षक कठडे लावण्याच्या कामाचा समावेश केला होता. मागणी प्रमाणे दहा लाखांचा निधी पाठवण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने जाळी लावण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे निधीला मान्यता मिळाली नाही. परिणामी निविदा प्रक्रिया होऊ शकली नाही. पुलावरील धोकादायक वळण लक्षात घेता, तातडीने उपाय करणे गरजेचे होते. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. शनिवारी (दि. 21) रात्री उड्डाणपुलाच्या त्याच ‘डेंजर स्पॉट’वरून पडून अकोला येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी प्राप्त झाला असताना संरक्षक जाळी लावण्याच्या कामात तत्परता दाखवली असती, तर ही दुर्घटना टळू शकली असती.

मनपा एनओसी देणार नाही
वारंवार होणारे अपघात पाहता महापालिकेने विशेष निधीतून उड्डाणपुलावर संरक्षक कठडे लावण्याचे काम आरंभ केले आहे. त्यासाठी सहा ते दहा लाख रुपयांचा निधी अपेक्षितदेखील धरला आहे. हे काम पूर्णत्वास येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार फडणवीस यांच्या निधीतून काम प्रस्तावित केल्यास महापालिका त्याला नाहरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे चित्र आहे.

अधिकारी गंभीर नाही
उड्डाणपुलावरील एकाच ठिकाणी अनेक अपघात झाले असतानादेखील अधिकारी गंभीर नसल्याचे चित्र आहे. निधी उपलब्ध असताना संरक्षक जाळी लावण्याबाबत काम का करण्यात आले नाही, या विषयी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर जरब बसेल.