आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नणंद-भावजयींच्या प्रामाणिकपणाने उजळली ‘सून'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील अनगडनगरमध्ये राहणारी एक महिला घरातील ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन सराफा बाजारात आली होती. हे सोने मोडायचे दोन महिन्यांनंतर मुलाच्या लग्नात सुनेसाठी नवीन दागिने करायचे, असे त्यांचे ठरले होते. मात्र, सराफाकडे जाण्यापूर्वीच दागिन्यांची त्यांची पर्स हरवली. ही बाब ज्या वेळी त्या महिलेला लक्षात आली, त्या वेळी तिच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र, दागिन्यांनी भरलेली ही पर्स अंबाविहारमध्ये राहणाऱ्या नणंद-भावजयींना सापडली. त्यांनी प्रामाणिकपणे ती पर्स राजापेठ पोलिसांना परत केली.
त्यामध्ये असलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे ज्या महिलेचे ते दागिने होते, ितला ते परत केले. या वेळी त्या महिलेसोबत तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. सुनंदा भीमराव तंतरपाळे (४८, रा. अनगडनगर) यांचेच ते दागिने होते, तर प्रतिभा विजय जंगले सविता सुनील तानकर (दोघे रा. अंबाविहार) असे दागिने परत करणाऱ्या नणंद-भावजयीची नावे आहेत. सुनंदा भीमराव तंतरपाळे यांचा मुलगा पोलिसांत आहे. त्याचे २७ मे रोजी लग्न होणार आहे. याच लग्नात सुनेसाठी दागिने करायचे होते म्हणून सुनंदा तंतरपाळे त्यांचा लहान मुलगा मुलगी हे तिघे घरातील जवळपास ११५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सराफा बाजारात आले होते. या वेळी दागिन्यांमध्ये चार मंगळसूत्र, दोन सोनसाखळ्या, दोन अंगठ्या, कानातील चार जोड टॉप्स, नऊ बेसर यांव्यतिरिक्त इतरही असे तीन लाख रुपयांचे दागिने होते.

सराफा बाजारातील एका हॉटेलमध्ये तंतरपाळे कुटुंबीय चहा पिण्यासाठी बसले होते. चहा पिल्यानंतर ते निघून गेले. या वेळी दागिन्यांची पर्स त्या हॉटेलमध्येच राहिली. त्यानंतर लगेच त्याच हॉटेलमध्ये प्रतिभा जंगले सविता तानकर या नणंद-भावजयी गेल्या होत्या. त्यांना ही पर्स दिसली. त्यांनी ही पर्स घेऊन तत्काळ राजापेठ पोलिस ठाणे गाठत ती पर्स पोलिसांच्या स्वाधीन केली. पर्समध्ये दागिन्यांसाेबतच एक मतदान कार्ड, मोबाइल क्रमांक होता. दुसरीकडे दागिन्यांची पर्स हरवली म्हणून तंतरपाळे यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पोलिसांत असलेल्या मुलालाही ही माहिती दिली. इतक्यातच राजापेठ ठाण्यातून फोन आला त्यांनी पर्स मिळाल्याचे सांगितले. बुधवारी राजापेठ ठाण्यात पोलिस उपायुक्त बी. के. गावराने यांच्या हस्ते सुनंदा तंतरपाळे यांना दागिने परत करण्यात आले; तसेच नणंद- भावजयींचा पोलिसांनी सत्कार केला. या वेळी एसीपी अशोक कळमकर, उपनिरीक्षक सचिन पुंडगे, नरेंद्र ढोबळे आदी उपस्थित हाेते.

प्रामाणिकपणा अजूनही जिवंत
आजच्याघटनेने समाजासमोर एक उत्तम आदर्श उभा केला आहे. प्रतिभा जंगले सविता तानकर यांनी तीन लाखांचे दागिने प्रामाणिकपणे परत केले. यावरून प्रामाणिपणा आजही जिवंत असल्याचे दिसून आले. हे दागिने आम्ही सुनंदा तंतरपाळे यांना परत केले आहेत. शिवाभगत, ठाणेदार, राजापेठ

आभार मानायला शब्द अपुरे
दागिन्यांचीपर्स दिसली नाही, त्या वेळी माझी अवस्था मलाच माहीत. मात्र, काही वेळातच दागिने राजापेठ पोलिस ठाण्यात असल्याचे समजल्यावर अत्यानंद झाला. दागिने परत करणाऱ्या महिलांचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत, असे सांगताना सुनंदा तंतरपाळे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.