आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालटले रूप: आयुक्तालयाचे कामकाज आजपासून नव्या इमारतीत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज उद्या, सोमवारपासून नव्या इमारतीत सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात सामान्य प्रशासन पुरवठा विभाग स्थानांतरित होत असून हळूहळू इतर सर्व विभाग या इमारतीत समाविष्ट करण्याचे आयुक्तालयाचे नियोजन आहे.
एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की जुन्या इमारतीलाही नव्या इमारतीसारखेच स्वरुप दिले जाणार असून राज्याच्या सहाही विभागात वेगळे स्थान निर्माण करणारी आयुक्तालयाची इमारत म्हणून अमरावतीला नवी ओळख मिळणार आहे. यासाठी शासनातर्फे तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नव्या इमारतीच्या बांधकामावर निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्चही झाला आहे.
आयुक्त कार्यालयात जवळपास २० शाखा (निरनिराळे विभाग) आहेत. सामान्य प्रशासन, महसूल, विकास, पुरवठा, पुनर्वसन, नियोजन, जिल्हा परिषद पालिका प्रशासन, मागास वर्ग कक्ष, नरेगा रोजगार हमी योजना अशी त्याची विभागणी आहे. याशिवाय आयुक्त, अप्पर आयुक्त विविध विभागांचे उपायुक्त अशा बड्या अधिकाऱ्यांचे कक्ष, बैठकीसाठी दोन सभागृह आणि िवक्रीकर वजनमापे विभागाची कार्यालये अशी जुन्या इमारतीची रचना आहे.
या सर्व गरजा लक्षात घेता नव्या इमारतीमध्ये १२ मोठे सभागृह बांधण्यात आले असून विविध अधिकाऱ्यांचे कक्ष, बैठकीसाठी सभागृह आणि इतर कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रारंभिक टप्प्यात पहिल्या माळ्यावर उपायुक्त माधव चिमाजी यांच्या नेतृत्त्वातील सामान्य प्रशासन विभाग स्थानांतरीत झाला असून त्यापाठोपाठ पुरवठा विकास विभागाचे कामकाजही त्याच इमारतीतून सुरू केले जाणार आहे.

नव्या इमारतीला इमर्जन्सी एक्झिट
नव्या इमारतीत आपात्कालीन मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) तयार करण्यात आला आहे. आग, भूकंप अशा नैसर्गीक संकटाच्या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर पडता यावे म्हणून इमारतीच्या मागच्या भागात स्वतंत्र पोलादी जीना तयार करण्यात आला आहे.
तळमजल्यावर आहे आयुक्तांचे कार्यालय
नव्या इमारतीच्या तळमजल्यावर विभागीय आयुक्तांचे कार्यालय थाटले जाणार आहे. भविष्यात पूर्ण इमारत तयार झाली की कदाचित आणखी काही विभागांची अदला-बदलही केली जाणार आहे. दोन्ही इमारती मिळून तब्बल ३० कक्षांची निर्मिती होणार आहे.
आयुक्तालयात दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग
- जुनी व नवी इमारत मिळून आकाराला येणाऱ्या आयुक्तालयात दोन्ही बाजूंनी प्रशस्त पर्किंग तयार करण्यात आले आहे. समोर छानसे उद्यान, त्यातच स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाची सोय अशी या इमारतीची एकूण रचना आहे.
माधव चिमाजी, उपायुक्त, आयुक्त कार्यालय
बातम्या आणखी आहेत...