आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकड्यांच्या सौंदर्यासाठी केंद्राकडून साडेचार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील शिवटेकडी आणि भीमटेकडी या दोन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्र सरकारने चार कोटी 57 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या सहकार्यामुळे टेकड्यांच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला, असे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर बोरकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने निधी मंजुरीचा हा आदेश 30 सप्टेंबरला काढला. राज्याच्या पर्यटन विभागाकडे मंजूर निधीपैकी 91 लाख रुपयांचा पहिला हप्ता पोहोचल्याची माहिती बोरकर यांनी या वेळी दिली. पत्रकार परिषदेला कॉँग्रसचे माजी शहराध्यक्ष वसंतराव साऊरकर आणि नगरसेवक बबलू शेखावत उपस्थित होते. शहरातील मध्यवस्ती परिसरात शिवटेकडी आणि जुनाबायपास लगत असलेल्या यशोदानगरजवळ भीमटेकडी वसलेली आहे. 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि अन्य शासकीय सुट्टय़ांच्या दिवशी या दोन्हीही टेकड्या स्थानिक नागरिकांनी गजबजलेल्या असतात.

पर्यटनस्थळ विकसित करणार
शहरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठय़ांपर्यंत सर्वच जण शिवटेकडी आणि भीमटेकडीवर सकाळ-सायंकाळ फिरायला येतात. येथून संपूर्ण शहर टप्प्यात येते. केंद्राच्या पर्यटन विभागाकडून निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भीमटेकडी अणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. शिवाय नागरिकांना विशेष सोयी-सुविधा उपलब्ध होतील. निधी आणण्याकरिता आमदार रावसाहेब शेखावत यांनी नवी दिल्लीतील पर्यटन विभागाच्या कार्यालयात पाठपुरावा केल्याचे बोरकर यांनी सांगितले.

वारसा जपण्यासाठी ‘पुरातत्त्व’ची परवानगी
दोन्ही टेकड्यांचे सौंदर्यीकरण करताना प्राचीन ऐतिहासिक पुरावे अणि वास्तू जतन करण्यासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व विभागाची परवानगी महाराष्ट्र सरकारमार्फत घेण्यात येणार आहे, असे केंद्र शासनाच्या निधी मंजूर आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त वन व पर्यावरण विभागामार्फत ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आली आहे.

निधीतून करण्यात येणार्‍या सुविधा
शिवटेकडीकरिता एक कोटी 71 लाख, तर भीमटेकडीकरिता दोन कोटी 64 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. दर्शनी आणि मागच्या बाजूने दोन स्वागतद्वार उभारण्यात येईल. संरक्षणभिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, परिसरातील सौंदर्यीकरण, विद्युतीकरण करण्यात येणार आहे. भीमटेकडीवर एक कोटी 63 लाख रुपये खचरून ध्यान केंद्राची इमारत उभारण्यात येईल.