आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर कृषिपंपांचा प्रयोग ठरला गडचिरोलीत कमालीचा यशस्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मागास आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात सिंचनासाठी सौर कृषिपंपाचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरत असून, शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन घेणे शक्य होत आहे. राज्यपालांच्या कार्यालयानेदेखील या प्रयोगाची दखल घेऊन त्याची इतरत्र कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल, यासाठी ऊर्जा विभागाला सूचना केल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात ८९ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास असल्यामुळे बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. त्यातच दुर्गम भाग आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे जिल्ह्याच्या काही भागात आजही विजेचा प्रश्न कायम आहे. शेतविहिरींचे प्रमाण चांगले असूनही विजेच्या प्रश्नामुळे सिंचनाची समस्या कायम आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गडचिरोलीच्या कृषी विभागाने दुर्गम तालुक्यांतील १३२ गावांचे सर्वेक्षण केले. त्यात सुमारे २०२ विहिरीधारक शेतकरी आढळून आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३ शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचे वाटप करण्यात आले. यात सर्वाधिक शेतकरी एटापल्ली, भामरागड, अहेरी तालुक्यातील आहेत. दोन अश्वशक्तीचे सौर ऊर्जेवर चालणारे कृषिपंप १०० टक्के अनुदानावर पुरवण्यात आले असून, त्याची किंमत जवळपास लाख २५ हजार रुपये आहे. सौरपंपांमुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाची समस्या सुटली. निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. प्रयोग यशस्वी ठरल्याने आता कृषी विभागाने आगामी आर्थिक वर्षात आदिवासी उपयोजनांतर्गत भामरागड तालुक्यातील ३० आणि एटापल्ली तालुक्यातील ३५ अशा एकूण ६५ शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषिपंपाचे वाटप करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे राज्यपालांचे कार्यालय या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. गडचिरोलीतील सौर कृषिपंपांचा यशस्वी प्रयोग राज्यभरात राबवण्यात यावा, अशा सूचना राज्यपालांकडून ऊर्जा विभागाला केल्या आहेत.