आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोल पार्टीवर हल्ल्याचा कट उधळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - छत्तीसगडमध्ये निवडणूक आटोपल्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीतून प्रवास करणार्‍या निवडणूक पथकावर हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी मंगळवारी उधळून लावला. मतदान यंत्रे घेऊन जात असलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांची वाहने उडवून देण्यासाठी पेरलेले भूसुरुंग आणि पाच बॉम्ब निकामी करण्यात आले. गस्तीवर असलेले नागपूरचे विशेष कृती दल, केंद्रीय राखीव दल आणि सी-60 च्या तुकड्यांवर विसामुंडी येथे नक्षलवाद्यांनी तुफान गोळीबार केला.

तीनही सुरक्षा दलांचे संयुक्त अभियान भामरागड उपविभागातील ताडगाव परिसरात सोमवारपासून सुरू होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विसामुंडी आणि बोटनफुंडी परिसरातून भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना घेरले व पथकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यांना सीआरपीएफ, नागपूरच्या कृती दलाने चोख प्रत्युत्तर दिले.

गडचिरोली मुख्यालय, छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे बिनतारी संदेश प्राप्त झाल्यानंतर खास हेलिकॉप्टरने कोम्बिंग ऑपरेशनची तयारी सुरू झाली. परंतु, याची कुणकुण लागल्याने नक्षलवादी पळून गेले. घटनास्थळाहून सुरक्षा दलांनी एक देशी बनावटीचे पिस्तुल, 10 पिट्ट, दोन डिटोनेटर, औषधांचा मोठा साठा, नक्षलवाद्यांचे प्रचार साहित्य जप्त केले. छत्तीसगडमध्ये निवडणूक सुरू असताना तेथील हिंसक कारवायांना महाराष्ट्रातून लगाम लागू नये म्हणून पोलिसांवर हा भीषण हल्ला करण्यात आल्याचे सीआरपीएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले. निवडणूक पथकांना उडवून देण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरलेले भूसुरुंग सुरक्षा यंत्रणेने निकामी केले. वाघडोंगरी परिसरात ही स्फोटके पेरून ठेवली होती. गडचिरोली आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे हे अभियान राबवले. 12 व्होल्टची बॅटरी, वायर आणि तारांच्या मदतीने सर्कीट तयार करून हा स्फोट घडवण्याचा कट होता.

मोठे यश मिळाले
नवागावजवळील नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी सहा ते सात बॉम्ब पेरले होते. अर्धा-अर्धा परिसर छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या हद्दीत असल्याने संयुक्त मोहीम राबवली. मतदान पथके नाल्यापासून अगदी जवळच होती. मात्र, त्यापूर्वीच दोन्ही राज्यांच्या पोलिस पथकांना हे बॉम्ब निकामी करण्यात यश आले. त्यामुळे अनेक कर्मचारी, अधिकार्‍यांचा जीव वाचला.’’ संजीव शुक्ला, पोलिस अधीक्षक, राजनांदगाव, छत्तीसगड