आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्यसाठा सिमेंटमिश्रित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्हाभरात वितरित केला जाणारा धान्यसाठा सिमेंटमिश्रित असल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली. धान्याच्या पोत्यांमध्ये सोंडे आणि अळ्यांचा शिरकाव झाल्याचेही दिसून आले. भारतीय अन्न महामंडळामार्फत पुरवला जाणारा हा धान्यसाठा सेंट्रल वेअर हाउसिंगच्या विलासनगरातील गोदामात आहे. यात गहू आणि तांदुळाचे किमान 40 हजार पोत्यांतील धान्य खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरवठा विभागाचे उपायुक्त माधव चिमाजी यांनी तातडीने गोदामातील धान्यसाठय़ाची पाहणी करून सिमेंट, सोंडे आणि अळ्यामिश्रित धान्यसाठय़ाची उचल न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी गहू आणि तांदुळाचे नमुने घेतले. चिमाजी यांच्यासमवेत जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदूरकर, तहसीलदार शरयू आडे, तांत्रिक अधिकारी बबन काळे, अन्न सुरक्षा अधिकारी जयंत वाणी, अनंत चौधरी होते. गोदामात धान्याची साठवणूक पद्धती बघून चिमाजी यांनी सेंट्रल वेअर हाउसिंगच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. गोदामातील गहू आणि तांदूळ साफ व स्वच्छ केल्याशिवाय संबंधित कंत्राटदारांनी उचल करू नये, असेही निर्देश चिमाजी यांनी दिले. विशेष म्हणजे, सातत्याने असहकार करणार्‍या वेअर हाउसिंगच्या सदस्यांना कडक शब्दांत त्यांनी समज दिला.

ट्रकमध्ये भरणा केल्यानंतर प्रत्येक वेळी सात ते आठ पोते धान्य खराब निघते. ते स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेत नाहीत आणि वेअर हाउसिंगचे अधिकारीही नकार देतात. प्रत्येक पोते उघडून पाहणे हे शक्य नसते. धान्यसाठा उतरवतानाच या बाबी लक्षात येतात.
-राजू गुप्ता, वाहतूक कंत्राटदार

सेंट्रल रेल्वे वेअर हाउसिंगच्या गोदामात या धान्यसाठय़ा सोबत सिमेंट, रासायनिक खत आणि अन्य साहित्यदेखील असते. तेथूनच असा अस्वच्छ धान्यसाठा आमच्याकडे येतो. हा साठा गोदामात ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. साफसफाई करूनच तो आम्ही वितरित करू.
-भीमराव कदम, अधीक्षक, सेन्ट्रल वेअर हाउस

गंभीर प्रकार
लाभार्थ्यांना खाण्यायोग्य धान्याचा पुरवठा करणे आमचे कर्तव्य आहे. स्वच्छ धान्य पुरवणे ही भारतीय अन्न महामंडळाची जबाबदारी आहे. अस्वच्छ धान्य आम्ही स्वीकारणार नाही. अशावेळी दाभा किंवा नेमाणी येथील गोदामातून धान्यसाठय़ाची उचल करू.
-माधव चिमाजी, उपायुक्त पुरवठा

गोदामात असलेला धान्यसाठा लवकरात लवकर वितरित करण्यात यावा. धान्यसाठा निर्धारित वेळेत वितरित केला नाही आणि परिणामी खराब झाला, तर ही संपूर्ण जबाबदारी सेंट्रल वेअर हाउसिंगची असेल, अशा भारतीय अन्न महामंडळाच्या सूचना आहेत.