आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘गणपती बाप्पा मोरया..’चा गजर, ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण तसेच डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अशा हर्षोल्हासात विविध मंडळांनी बाप्पांची मिरवणूक काढली आणि त्यांना स्थापनेच्या ठिकाणी आणले. गल्लीबोळात व चौकाचौकांत निघालेल्या मिरवणुकींनी अख्खे शहर दणाणून गेले होते. चैतन्यमय वातावरणात गणेश उत्सवाच्या या सणात अमरावतीकर न्हाऊन निघाले होते.

‘देवा श्रीगणेशा’ या गाण्यांची धून कानी पडताच मिरवणुकीत सहभागी आबालवृद्धांनादेखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही. बच्चेकंपनीचा जल्लोष काही औरच होता. डोक्याला गणरायाची पट्टी, चेहर्‍याला फासलेला आणि दोन्ही हातांच्या मुठींमध्ये गच्च भरलेला गुलाल असा प्रत्येकाचा तोरा होता. काही मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणेश मिरवणूक काढली. काही मंडळांनी टाळ-मृदंगाचा गजरात अभंग म्हणत, दिंडी काढून मिरवणुकीचा आनंद घेतला, तर काही मंडळांनी पालखीत गणरायाला बसवून मिरवणूक काढली. कपाळावर टिळा, पांढरेशुभ्र कपडे तसेच डोक्यावर फेटे अशा वेशेभूषेत काहींनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी आझाद गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील बजरंग चमूने राजकमल चौकात मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून वेगळी रंगत आणली. युवती तसेच महिलांनीसुद्धा गणरायाचे विविध चौकांमध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत केले.