आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात एक हजार 666 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील नागरिक आतुर झाले असून त्यांनी आज जय्यत तयारी केली. त्यामुळे जिल्ह्यात भक्तिभावपूर्ण वातावरण तयार झाले आहे. दहा दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शहरात प्रत्येक ठाणेदाराला ‘स्ट्रायकिंग फोर्स’ देण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी आज घेतला.

पोलिस आयुक्तालयाच्या दहा ठाण्यांच्या हद्दीत मंडळांची संख्या साडेपाचशेच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षी आयुक्तालयातील 35 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ होता. यावर्षी त्यात वाढ होऊन तो आकडा 42 वर पोहचला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडून शांतता व सुरक्षिततेस गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मुख्यालय आणि इतर पथकांतील कर्मचारी संख्या कमी करून सर्वांना बंदोबस्तावर तैनात करण्यात येणार आहे. आणिबाणीच्या क्षणात पोलिस पोहोचावेत, यासाठी प्रत्येक ठाणेदारासोबत ‘स्ट्रायकिंग फोर्स’ राहणार आहे. आयुक्तांसोबत दोन स्ट्रायकिंग फोर्स तसेच पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्तांनाही स्ट्रायकिंग फोर्स देण्यात आली आहे. प्रत्येक स्ट्रायकिंग फोर्समध्ये एक पीएसआय आणि 10 सशस्त्र कर्मचारी राहणार आहेत. विसर्जनाच्या वेळी पाण्यात पडून अपघाताच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पोहणारे गावकरी आणि पोलिस यावेळी हजर राहतील.

325 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’
जिल्ह्यात एक हजार 154 सार्वजनिक गणेश मंडळ असून, 325 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’च राहणार आहे. या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात एक अपर पोलिस अधीक्षक, सात पोलिस उपअधीक्षक, 21 पोलिस निरीक्षक, 85 एपीआय आणि पीएसआय, 1800 कर्मचारी, 100 प्रक्षिणार्थी पोलिस, 20 प्रक्षिणार्थी पीएसआय, 600 पुरुष होमगार्ड व 100 महिला होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी तैनात राहणार आहे. या काळात वरिष्ठ कार्यालयाकडून ‘अलर्ट’ घोषित केला असल्यामुळे विशेष सुरक्षा देण्यात येत आहे.

उत्सव शांततेत साजरा करा
नागरिकांनी उत्सव शांततेत साजरा करावा व पोलिसांना सहकार्य करावे. बेवारस वस्तू आणि संशयास्पद व्यक्तींबाबत तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. अजित पाटील, पोलिस आयुक्त

गर्दीच्या ठिकाणी विशेष नजर
बुधवारा, इर्विन चौक, राजापेठ, र्शीकृष्णपेठ या परिसरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या भागावर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

भारनियमनातून सुटका
गणेशोत्सवात जिल्ह्यातील 53 फीडरवरील भारनियमन बंद करण्यात आले आहे. 19 सप्टेंबरपर्यंत या फीडरअंतर्गत येणार्‍या ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा होणार आहे. शहरातील सात व ग्रामीण भागातील 46 फीडरचा त्यात समावेश राहील, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांनी सांगितले.