परतवाडा- दहा दिवस मुक्कमी राहून घराघरांत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या
आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना लहान थोरांसह प्रत्येकांनी जड अंतकरणाने भरपावसामध्ये सोमवारी (दि. ८) निरोप दिला.
ढोल, ताशांच्या निनादात वाजत गाजत, गुलालाची उधळण करत कुणी डोक्यावर, कुणी दुचाकीवर तलाव, विहीरीच्या ठिकाणी नेऊन गणरायांचे विसर्जन करण्यात आले. या वेळी गणपती बाप्पा मोरय्या, एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा जयघोषणांनी सर्व परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन िनघाला. विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या... ची आर्त हाक श्रींच्या भक्तांनी आपल्या बाप्पाकडे केली. अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा अंतर्गत येणा ऱ्या विविध गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला. सोमवारी गणपती विसर्जन करण्यात आले. अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६, परतवाड्यातील पाच आणि सरमसपुरा परिसरातील सहा असे एकूण ३७ मंडळाच्या गणरायांसह घराघरांतील गणरांयांचे विसर्जन करण्यात आले. या वेळी सकाळपासून पाऊस सुरू असतानाही श्रींच्या भक्तांचा आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी उत्साह दिसून आला. परतवाडा शहरात सहा पोलिस अधिकारी, ८० पोलिस कर्मचारी तैनात होते. अचलपूर शहरात १२ अधिकारी, १६२ कर्मचा-यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. गणरायांचे विसर्जन चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी नगरपालिकेच्या वतीने सापन नदीवर व्यवस्था करण्यात आली होती.