आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिजाची चोरी बनली मृत्यूचा सापळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराच्या सभोवताल खुलेआम होत असलेली गौण खनिजाची चोरी निष्पाप जिवांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे. या प्रकाराने शहराच्या आजूबाजूचा परिसर पोखरला गेला असून, लवकरच सुरू होत असलेल्या पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात प्राणहानीची भीती राहते. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गौण खनिजाची चोरी होत असली, तरी प्रशासन उपाययोजना करण्याच्या विषयात ढिम्म आहे.

महसूल प्रशासनाकडून रेवसा, राजुरा, खानापूर येथे केवळ खासगी जमिनीतून गौण खनिज उत्खननाची परवानगी देण्यात आली. मात्र, अधिकृत परवानगी नसताना शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता डोंगर, जमीन पोखरून मुरूम काढला जात आहे. गौण खनिजचोरी रोखण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्राच्या तलाठ्यावर असते. मात्र, महसूल प्रशासनातील या महत्त्वपूर्ण घटकाने त्याकडे ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा केला आहे. गौण खनिजाच्या चोरीमुळे या जागांवर खोल खड्डे तयार झालेत. या खड्ड्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या आठ घटना दोन वर्षांमध्ये घडल्या आहेत. या ठिकाणी किमान धोक्याच्या सूचना देणारे फलक लावणे तसेच खनिजचोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

येथे पोखरली जमीन
शहरालगतच्या रहाटगाव, महादेव खोरी, कोंडेश्वर मार्ग, अंजनगावबारी मार्ग, वरुडा, वलगाव मार्ग, कोंडेश्वर ते मालखेड मार्ग, बोरगाव धर्माळे, मार्डी मार्गावर जमीन मुरुमासाठी मोठ्या प्रमाणात पोखरण्यात आली आहे. याशिवाय शहरातील इतर भागांमध्येही मोठे खड्डे तयार झाले आहेत.

येथे गमावले जीव
गौण खनिज उत्खननानंतर शिल्लक राहिलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून सहा ते आठ जणांचा जीव गेला आहे. रहाटगाव येथे दोन मुले, वरुडा येथे दोन बहिणी, बडनेरा येथे ट्रॅक्टरवरील मजूर व अन्य एका घटनेत एकाचा बुडून मृत्यू झाला. खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत अशा घटना घडतात.
० बडनेरा शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कोंडेश्वर मार्गावरील मधुबन आश्रमासमोर बुधवारी गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू होते.
० आश्रमासमोरील खुल्या जागेतून एका ट्रॅक्टरमध्ये तीन ते चार लोक मुरूम टाकत होते.
० सकाळी 11:30 ते 12 च्या सुमारास राजरोसपणे हा प्रकार सुरू होता.
० याबाबत पोलिस व महसूल अधिकाºयांना माहिती मिळू नये, याचे आश्चर्य वाटते.