आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेड काढून पळाले बाइकर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शाळा सुटल्यानंतर बाहेर पडलेल्या जेमतेम नवव्या, दहाव्या वर्गातील एका विद्यार्थिनीची सलग दोनदा अत्यंत लज्जास्पद प्रकारे छेड काढत चार बाइकर्स तरुणांनी पोलिसांनाही हुलकावणी देत ‘धूम स्टाइल’ पळ काढला. हे तरुण जेमतेम 17 ते 18 वर्षांचे होते. बुधवारी दुपारी 1:15 च्या सुमारास ही घटना इर्विन चौकानजीक ज्ञानमाता हायस्कूलजवळ घडली. या तरुणांची हिंमत इतकी वाढली होती, की 20 मिनिटांनी पुन्हा परतून त्यांनी आणखी दोन विद्यार्थिनींची छेड काढली. या वेळी मात्र चौघांनीही आपापल्या बाइकची नंबर प्लेट काढून ठेवली होती.

शाळा सुटल्यावर बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीला या बाइकर्स टवाळखोरांनी जवळच असलेल्या एका बस स्टॉपजवळ गाठले. त्यांपैकी एका टीनएजरने मुलीचा हात पकडला, तर दुस-याने तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील काही वाहनचालक तेथे थांबले. त्या वेळी जवळूनच एक वाहतूक पोलिस जात असल्याचे पाहून घाबरलेल्या ‘त्या’ बाइकर्सनी पळ काढला. ज्ञानमाता शाळेजवळून हे बाइकर्स प्रचंड वेगाने इर्विन चौकाकडे निघाले. त्यातील तीनही जणांनी रेड सिग्नल तोडून पुढचा रस्ता गाठला. तिघे रेल्वे स्टेशनकडे, तर एक पंचवटीकडे पळाला. चौकात कार्यरत दोन वाहतूक पोलिसांनी मध्ये येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांच्याच अंगावर बाइक नेली. सुमारे 20 मिनिटांनी चारही बाइकर्स परत शाळेजवळ आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त बी. के. गावराने तातडीने घटनास्थळी दाखल झाले; बाइकर्स मात्र तोपर्यंत पसार झाले होते.

चार बाइकवर आलेल्या अल्पवयीन तरुणांच्या दुचाकी महागड्या होत्या. कपडेही अत्यंत पॉश होते. त्यावरून ते गर्भश्रीमंत घरांतील असावेत, असा अंदाज येत होता. सर्वच जण हिंदीतून संभाषण करीत होते. जेमतेम 17-18 वर्षांच्या या मुलांपैकी एकाने पांढरा शर्ट आणि ब्लॅक पँट, एकाने निळा टी-शर्ट आणि ब्लॅक पँट, तर एकाने काळा टी शर्ट आणि त्यावर लाइनिंगचा शर्ट घातला होता.

तक्रार नाही : छेडखानी झालेल्या तीनही तरुणींनी किंवा त्यांच्या पालकांनी प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली नाही. घटनेनंतर नाकाबंदी केल्याचे उपायुक्त गावराने यांनी सांगितले.
उपायुक्तांची तत्परता : सलग दोनदा आलेल्या या तरुणांबाबत सर्वप्रथम पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने वायरलेसवरून सर्व पोलिस टीम आणि ट्रॅफिक पॉइंटला सतर्क केले. हा वायरलेस संदेश ऐकून उपायुक्त गावराने तातडीने ज्ञानमाता शाळेजवळ आले. परंतु, एकही चार्ली कमांडो, पेट्रोलिंग वाहन घटनास्थळी आले नाही.

मॅडम, आम्हालाही चेक करता का
सायन्स्कोर मैदानाच्या परिसरातून जात असलेल्या मुलींना ‘हॅलो मॅडम, आम्हालाही दुखतंय, चेक करता का?’ असे म्हणून दोन युवतींची छेड काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. या घटनेनंतर स्तब्ध झालेल्या आणि घाबरलेल्या मुलीने शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी हमालपुरा येथे राहणा-या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने मुली घाबरल्या आहेत.
टवाळखोरांचे टोळके : ज्ञानमाता शाळा, गर्ल्स हायस्कूल चौक, ब्रजलाल बियाणी कॉलेज, समर्थ हायस्कूल, श्री शिवाजी कॉलेज, गाडगेनगर उड्डाणपूल, हेमंत नृत्यकला मंदिर परिसर, शेगाव नाका चौक, कॅम्प परिसर या ठिकाणी टवाळखोरांचे टोळके सातत्याने घिरट्या घालत असते. अनेक तरुणांचे टोळके येथे काम नसतानाही थांबून असते. परंतु, पोलिसांची अपुरी गस्त आणि शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर अनाहूत मुलांना शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थांबण्यास पोलिसांकडून मनाई केली जात नसल्याने ज्ञानमाताजवळ घडलेला प्रकार अनेक ठिकाणी घडतो आहे.

पुढे काय
शहरात मागील काही दिवसांपासून टवाळखोरांचा उच्छाद वाढत आहे. पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करीत शहरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात भरधाव वाहने चालवणा-यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.
फोटो - डमी पिक