आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे गेल्या महिला मदत हेल्पलाइन?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध संघटना, संस्था, प्रशासन, पोलिसांतर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आल्यात. मात्र, एचव्हीपीएम वगळता इतर सर्व हेल्पलाइन निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. शहरात अत्याचाराच्या घटना वाढल्या असताना इतर सा-या हेल्पलाइन कुठे गेल्या, असा प्रश्न आता शहरातील संतप्त महिलांतर्फे केला जात आहे.

हेल्पलाइनवर अविश्वास का?
शहरात महिलांसाठी सुरू झालेल्या हेल्पलाइनचा आढावा घेतला असता, केवळ एचव्हीपीएमच्या हेल्पलाइनकडेच महिला अत्याचाराच्या घटनांबाबत मदत मागितली जात असल्याचे दिसून आले आहे. महिलांमध्ये इतर हेल्पलाइनवर तक्रार किंवा समस्या नोंदवण्यासंदर्भात अविश्वास का निर्माण झाला आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

दूर सारा बदनामीची भीती
अत्याचारपीडित मुलगी, युवती, स्त्री किंवा तिचे कुटुंबीय समाजात होणा-या भीतीचे दडपण बाळगून प्रकरणाची पोलिस तसेच हेल्पलाइनकडे तक्रार करीत नाहीत. नाव गुप्त ठेवले जात असतानाही बदनामीची भीती बाळगली जाते, ती दूर व्हायला हवी; अन्यथा अत्याचार करणारे मोकाट राहिल्याने ते आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी आहेत विविध प्रकरणे
महिला व मुलींची छेडखानी, चिडीमारी, अश्लील एसएमएस, फोन कॉल, फसवणूक, हुंडाबळी, पाठलाग, मारहाण, पती पीडिता, कौटुंबिक वाद, एकतर्फी प्रेमप्रकरण अशी विविध प्रकरणे हेल्पलाइनने सोडवली आहेत.

हेल्पलाइनचे स्वरूप
एचव्हीपीएम हेल्पलाइनमध्ये कायमस्वरूपी 25 सदस्यांचा समावेश आहे. सर्वधर्म आणि जातीच्या व्यक्तींचा समावेश असलेल्या या समितीमध्ये आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक, संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पोलिस अधिकारी, खेळाडूदेखील आहेत.
चार हजार प्रकरणांना फोडली वाचा
एचव्हीपीएम हेल्पलाइनने 2006 पासून महिला अत्याचाराच्या सुमारे चार हजार प्रकरणांना वाचा फोडली आणि अंधार दाटलेल्या त्यांच्या जीवनाला प्रकाशाची वाट दाखवली.
महिला खेळाडूंची सुरक्षा
सामान्य स्त्रियाच नव्हे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणा-या महिला खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्या अनेकदा एकट्याच बस, रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. अशात त्यांचा प्रवास सुरक्षित होईल, या उद्देशाने जबाबदार व्यक्ती किंवा महिला सुरक्षा अधिकारी त्यांच्यासोबत असायला हवी, अशी महिला खेळाडूंची मागणी आहे.
गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज
- एचव्हीपीएम हेल्पलाइन गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास नेहमीच सज्ज असते. आमच्याकडे दररोज महिला अत्याचाराच्या दोन कसेस येतात. त्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. संजय तीरथकर, हेल्पलाइन सदस्य