आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये शुभमुहूर्ताला सोने अन् चांदीवर मंदी पडली भारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मंदीच्या पार्श्वभूमीवर पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सराफा बाजारात गुरुवारी केवळ एक किलोच्या घरात सोन्याची उलाढाल झाली.

पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर सोने, चांदीची खरेदी होणार, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला होता. मात्र, आर्थिक मंदीमुळे बोटांवर मोजण्याइतकेच ग्राहक गुरुवारी सराफा बाजारात दिसून आले. सराफा बाजारातून मागणी कमी झाल्याने सोने-चांदीच्या खरेदीतही गुरुवारी मंदी होती. एरवी मोठय़ा तेजीत सोने व चांदीची खरेदी ग्राहकांकडून करण्यात येते. तथापि, गुरुवारी बाजारात नागरिकांची विशेष वर्दळ दिसली नाही. शाकंभरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आलेल्या गुरुपुष्यामृत योगावर ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर आभूषण खरेदी करण्यात येते. आजची पौर्णिमा ही पुनर्वसु पर्वावर, विष्कंभ नक्षत्रावर तसेच बालव योग, अशा तिहेरी पर्वावर आल्याने ग्राहकांची गर्दी वाढणार असल्याचे विक्रेत्यांचे भाकित फोल ठरले. गुरुवारी सोने 29 हजार 900, तर चांदी 54 हजार रुपयांवर होती.

बाजारात शुकशुकाट
मंदीचा फटका सराफा बाजाराला बसला आहे. मोजक्याच दुकानांत ग्राहकांची गर्दी होती, तर उर्वरित दुकानांत शुकशुकाट होता. गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणावर सोने, चांदीची खरेदी होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. यंदाही लग्नसराईत सोने व चांदीचे दर वाढणे अपेक्षित आहे. राहुल माटोडे, सुवर्णकार.