आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृद्धेचा गळा आवळून 41 ग्रॅम सोने लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील फरशी स्टॉपनजीक सुभाष कॉलनी येथे चोरट्यांनी घरात शिरून सोने लंपास केले. घरात एकट्या असलेल्या 75 वर्षीय महिलेचा त्यांनी गळा आवळला. यानंतर शुद्ध हरपलेल्या महिलेच्या गळ्यातील 41 ग्रॅम वजनाचे दागिने ओढून पळ काढला. हा थरार गुरुवारी दुपारी घडला.
सविता मुकुंदराव पांढरीकर असे जखमी महिलेचे नाव आहे. घरात त्या व मुलगी सोनाली अशा दोघीच राहतात. सोनाली बँकेत नोकरीला आहेत. गुरुवारी सकाळी दोन युवक त्यांच्या घरी आले. आम्ही बँकेचे प्रतिनिधी आहोत. बँकेकडून वृद्ध व्यक्तींसाठी वैद्यकीय विमा योजना सुरू आहे. ती आपण घ्यावी, असे त्यापैकी एकाने सांगितले. त्याने स्वत:ची ओळख सारंग (रा. रुक्मिनीनगर) अशी दिली. त्यावेळी सोनालीदेखील घरी होत्या. त्यांच्यादेखत त्या बँकेत निघून गेल्या. काही वेळानंतर ते दोघे युवकही निघून गेले. दुपारी तीन वाजता सविता पांढरीकर एकट्याच असताना तेच दोन युवक घरात शिरले. त्यांनी पांढरीकर यांचा गळा आवळला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर पांढरीकर यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनसाखळी, 29 ग्रॅमच्या बांगड्या आणि चार ग्रॅमची अंगठी असे सोन्याचे 41 ग्रॅमचे दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. पांढरीकर या सुमारे दोन तास बेशुद्धावस्थेत पडून होत्या. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सोनालीला फोन केला. बरे वाटत नसल्याचे सांगितल्याने सोनाली घरी आल्या आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पांढरीकर यांनी घटना कथन केली. हा घटनाक्रम पुढे येईपर्यंत त्यांना आजाराचा झटका आला, असाच समज होता.
यानंतर नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. रात्री गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय, उपनिरीक्षक संदीप राजपूत यांच्यासह फ्रेजरपुरा आणि गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांत उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.