आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Hostel\'s Student Abandon Food Issue At Amravati

वादंगानंतर वसतिगृह विद्यार्थ्यांचा अन्नत्याग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- निकृष्ट भोजनाच्या मुद्दय़ावर विद्यार्थी आणि मेस कंत्राटदार यांच्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर निंभोरा येथील सामाजिक न्याय भवनात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
वसतिगृहाचे सुरक्षा रक्षक, अधिकारी, कर्मचार्‍यांनी यात मध्यस्थी केल्यानंतर संभाव्य अनुचित प्रकार टळला. मात्र, यानंतर वसतिगृहातील पाचशेवर संतप्त विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

समाज कल्याण विभागाने ठरवून दिलेल्या भोजन मेन्यूनुसार मेस कंत्राटदार भोजन देत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वसतिगृहाच्या विंग क्रमांक एकमध्ये मागील अनेक दिवसांपासून हा वाद धुसफूसत आहे.

शनिवारी त्याचा भडका उडाला. विद्यार्थ्यांची नारेबाजी, आरडाओरड यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. बुधवारी व शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार भाजी देण्याची पद्धत आहे. परंतु, शनिवारी मेस कंत्राटदाराने कढी, भजे आणि भात असे भोजन दिले. त्याचा दर्जाही चांगला नव्हता. पोळ्या जळालेल्या होत्या, असा आरोप करीत विद्यार्थ्यांनी जेवणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर विद्यार्थी व मेस कंत्राटदार, कर्मचार्‍यांमध्ये वाद सुरू झाला. मेस कंत्राटदाराचे काही कर्मचारी विद्यार्थ्यांच्या अंगावर धावले. त्यामुळे संतप्त पाचशेवर विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिहल्ला करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थ्यांचा हा रुद्रावतार पाहून सुरक्षा रक्षक मध्यस्थीसाठी धावले आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर गजानन गीते, संदीप बोरेकर, विकास राठोड, नीलेश वानखडे, निलेश बोरवार, सोपान ढोले, विनोद राठोड, अमोल दहेकर, धम्मदीप पाईकराव, दशरथ गिरी या विद्यार्थ्यांनी तातडीने गृहपाल श्रीमती झोड यांच्याशी संपर्क साधून अन्नत्याग आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

दोन हजारांवर विद्यार्थ्यांची कॉलनीच
निंभोरा स्थित सामाजिक न्याय भवन जणू विद्यार्थ्यांसाठी शासनाने वसवलेली खास कॉलनीच आहे. येथील पाच ते सात विंगमध्ये दोन हजारांवर विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये राहतात. शनिवारी ज्या विंगमध्ये हा वाद निर्माण झाला, तेथे सुमारे साडेतीनशे विद्यार्थी राहतात. कंत्राटदाराने खराब अन्न दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप होता.

वरिष्ठांना दिली माहिती
वसतीगृहातील याप्रकाराबाबत समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. कौटुंबिक सोहळ्यासाठी मी सुटीवर असल्याने परत येताच या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल. विद्यार्थ्यांशी वाद न घालण्याबाबत कंत्राटदारास सूचना दिली आहे. सुनीला झोड, गृहपाल

नियमानुसार भोजन
समाजकल्याण विभागाने ठरवून दिलेल्या नियमाच्या आधारेच विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. शनिवारीदेखील त्याच पद्धतीने भोजन दिले गेले. आमच्या कोणत्याही कर्मचार्‍याने आजवर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केलेले नाही. आरोप चुकीचे. संजय महाजन, कंत्राटदार