आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कक्ष दक्ष, पण कुणाचे ना लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गंभीर परिस्थितीत नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली जीवनरक्षक प्रणाली म्हणजेच व्हेंटिलेटरचा एकही संच शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

प्रसूतीसाठीचे जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि इतर आजारांसाठीचे जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) या दोन्ही ठिकाणी लहान बालकांच्या प्राणांची रक्षा करणारे व्हेंटिलेटर नाहीत. डफरीनमध्ये नवजात बालक विशेष शुर्शुषा केंद्र (स्पेशल न्यू बॉर्न बेबी केअर यूनिट एसएनसीयू) अस्तित्वात आहे. तीस दिवसांच्या नवजात बालकांसाठी हा विशेष कक्ष आहे. या सेंटरमध्ये एका वेळी 22 बालकांवर उपचार होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. अटीतटीच्या परिस्थितीत एकाच वेळी 40 बालकांवरसुद्धा उपचार करण्यात येतात, असे तेथील परिचारिकांनी सांगितले. मात्र, या नवजात शिशू केंद्रात व्हेंटिलेटरचा एकही संच उपलब्ध नाही. बाळाची प्रकृती ढासळली, तर त्या बाळाला नियमानुसार नागपूर अथवा अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात तत्काळ दाखल करण्याचा सल्ला देऊन वैद्यकीय अधिकारी मोकळे होतात. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणकुमार यादव यांना विचारले असता, ते म्हणाले, की जिल्हा स्त्री रुग्णालयात बालकांच्या आरोग्यासाठी व्हेंटिलेटरची तीव्र गरज आहे. इर्विनमध्ये बालकांची शुर्शुषा करण्यासाठी वॉर्ड क्रमांक पाच हा विशेष कक्ष आहे. एक महिन्याच्या वर वय असलेली मुले येथे दाखल करण्यात येतात. तथापि, इर्विनमध्येही बालकांवर उपचार करण्यासाठी गरज पडली, तर व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही, असे तेथील परिचारिकांनी सांगितले.

सात व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध आहे
डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात बालकांसाठी एक, तर अन्य रुग्णांसाठी सहा व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. डॉ. वसंत लवणकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय.

वॉर्मर आणि इन्क्युबेटर आहे
लहान बालकांच्या शुर्शुषेसाठी डफरीनमध्ये वॉर्मर आणि इन्क्युबेटर आहे. व्हेंटिलेटरची गरज आहे. प्रस्तावित यादीमध्ये व्हेंटिलेटरचा समावेश आहे. डॉ. अरुणकुमार यादव, वैद्यकीय अधीक्षक, डफरीन.

नमुना परिसरातील गल्ली क्रमांक दोनमध्ये राहणारे अब्दुल सादिक यांच्या कुटुंबावर अशना तबस्सुम ही चिमुकली गमावण्याचे दुर्दैव ओढावले. 27 दिवसांच्या या चिमुकलीची न्यूमोनियामुळे प्रकृती खालावली. तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेले हते. 27 दिवसांच्या या चिमुकलीला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. तेथील डॉक्टरांनी तिला डफरीनमध्ये नेण्याचा सल्ला दिला. मात्र, डफरीनसह इतर रुग्णालयांतही सुविधाच नसल्याने त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाहीत. परिणामी, या चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे अब्दुल सादिक यांचे म्हणणे आहे.