आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Great Context Of Humans To Youth Development D. R.. Banasoda

महामानवांच्या विचारांतून तरुणांनी साधावी प्रगती- डी. आर. बनसोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वंचित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे झाल्यास त्यांचा आर्थिक स्तर उंचवाणे आवश्यक असल्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता. त्यामुळे तरुणांनी महामानवांच्या विचाराचे आचरण करून प्रगती साधावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी केले. लोकसन्मान परिषदेतर्फे आयोजित अमरावती युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते शनिवारी सायंकाळी (दि. 1) सायन्सकोर मैदानावर बोलत होते. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे.
युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना ऐकता यावेत, यासाठी लोकसन्मान परिषदेतर्फे अमरावती युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री नृत्यस्पध्रेला सुरुवात झाली. बनसोड पुढे म्हणाले, की युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळावा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा, उद्योगांमध्ये युवकांना करिअर करता यावे, यासाठी प्रेरणादायी असा उपक्रम लोकसन्मान परिषदेने हाती घेतला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
लोकसन्मान परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत देवपारे या वेळी अध्यक्षस्थानी होते. इंडिया बुल्स कंपनीचे उपाध्यक्ष राजसिंह नांदल, जानराव औगड, स्वाती देवपारे, मुंबई येथील नर्तक सचिन तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नांदल या वेळी म्हणाले, की जे समाजकार्य करतात, ते सकारात्मक विचारांचे असतात. जीवनात प्रगती करण्यासाठी सकारात्मक विचाराची गरज असते. म्हणून प्रत्येकाने समाजकार्य करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. देवेंद्र शेरेकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले.
महोत्सवात रविवारी (दि. 2) उद्योग व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, आदर्श शिक्षक सत्कार समारंभ आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. केवळ सात रुपयांची गुंतवणूक करून उद्योग सुरू करणारे देविदास राऊत, उद्योजक भीमराव क्षीरसागर, आयएएस डॉ. प्रदीप गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांचेविद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, तहसीलदार अनिल भटकर यांच्यासह अनेकांची या वेळी उपस्थिती राहणार आहे. सोमवारी (दि. 3) लोकसन्मान परिषदेच्या सातशे शाखांचे गुणवंत देवपारे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर धम्मदान सोहळ्यात मूर्तींचे दान करण्यात येईल. रुग्णवाहिका लोकार्पण, स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे दान, दिनदर्शिकेचा लोकार्पण आदी विविध कार्यक्रम या प्रसंगी होणार आहेत.