आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील गटबाजी पोहोचली "मातोश्री'वर, आठही विधानसभा क्षेत्रातून आल्या तक्रारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्‍ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी बालेकिल्ल्यात झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) शहरात आलेले शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना गटबाजीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या लिखित तक्रारी त्यांनी सोबत नेल्या असून, त्यावर "मातोश्री'वर मंथन होणार आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा क्षेत्रातून तक्रारी आल्याने शिवसेनेत अंतर्गत गटबाजी झाल्याचे स्पष्ट होत आहे. या तक्रारींचा निवाडा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वता करणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत रामदास कदम यांनी दिले.

शिवसेनेकडून शिव संपर्क मोहीम राबवली जात असून, मागील एक लोकसभा दोन विधानसभा निवडणुकीत विदर्भात मिळालेल्या मतांची गोळा-बेरीज केली जात आहे. या मोहिमेसाठी शिवसेनेचे पाच कॅबिनेट पाच राज्यमंत्री विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. जिल्ह्याची जबाबदारी पर्यावरण मंत्री रामदास कदम उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्यावर होती. दोन्ही नेत्यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आठही विधानसभा क्षेत्रनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सकाळी ११.३० वाजता सर्वप्रथम अमरावती, तर सर्वांत शेवटी दुपारी चार वाजता मोर्शी विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पंधरा ते वीस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. पराभवाची कारणे तसेच तक्रारी लिखित स्वरूपात नोंदवण्यात आल्या. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतून लिखित स्वरूपात तक्रारी रामदास कदम यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींचा गठ्ठा मातोश्रीवर देण्यासाठी कदम सोबत घेऊन गेलेत.

रवींद्र मिर्लेकर, की संजय राठोड?
जिल्ह्यातनेतृत्वबदल होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. सोबत संपर्क प्रमुख पद कोणाकडे दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडे संपर्क प्रमुख पद कायम ठेवणार, की नव्याने नेमले जाणार आहे? कार्यकर्त्यांच्या मते, रवींद्र मिर्लेकर किंवा राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

पक्षप्रमुख घेतील नेतृत्वबदलाचा निर्णय
काहीदिवसांपूर्वी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडून घेण्यात आलेल्या आढाव्यातदेखील नेतृत्वबदलाबाबत चर्चा झाली होती. पर्यावरण मंत्री तथा नेते रामदास कदम उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्याकडून घेण्यात आलेल्या आढाव्यादरम्यान देखील हाच विषय पुन्हा चर्चेला आला. नेतृत्वबदलाबाबत निर्णय मातोश्रीवरून होणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.