अमरावती - अमरावती महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून चंद्रकांत गुढेवार यांची वर्णी लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अमरावतीचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचा संदेश गुढेवार यांना बुधवारी (दि. ८) प्राप्त झाला असून, मंत्रालयातून याबाबत आदेश देखील निर्गमित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून आयुक्त अरुण डोंगरे यांच्या बदलीला चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नवीन आयुक्त चंद्रकांत गुढेवार हे सद्य:स्थितीत मंत्रालयातील ग्रामविकास विभागात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. जून २०१३ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान ते सोलापूर महापालिकेचे आयुक्त राहिले आहेत. सोलापुरातून त्यांची पाणी प्रश्नावरून बदली करण्यात आली होती. मात्र, जनआंदोलनाच्या रेट्यामुळे त्यांना परत यावे लागले. विद्यमान अायुक्त अरुण डोंगरे यांची बदली कोठे करण्यात आली, याबाबत मात्र काेणतीही अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.