अमरावती- जानेवारी महिन्यातील गारपिटीमुळे नुकसान झेलणार्या शेतकर्यांनासुद्धा नव्या दराने भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा सुधारित अध्यादेश शुक्रवारी (दि. 2) जारी करण्यात आला. रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकर्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
डिसेंबर 2013 व जानेवारी 2014 मध्ये झालेल्या गारपीट व अकाली पावसामुळे जिल्ह्यात 11 हजार 512 हेक्टरवरील पारंपरिक पिकांचे व आठ हजार 79 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. या सर्व 18 हजार 408 शेतकर्यांना प्रचलित दरानुसार मदत दिली जावी, असे शासनाचे म्हणणे होते. हा प्रचलित दर फेब्रुवारी व मार्चची नुकसानभरपाई देण्यासाठी ठरवलेल्या नव्या दरांच्या तुलनेत जवळपास निम्मा होता. त्यामुळे शेतकर्यांसह लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला होता.
मोर्शी-वरुडचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या निर्णयाविरोधात महाराष्ट्रदिनी उपोषणाचा इशारा दिला होता. दुसरीकडे इतर लोकप्रतिनिधींनी शासनाच्या निर्णयाबद्दल नाक मुरडत सुधारित दरानेच मदत करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासनाने आपला जुना निर्णय फिरवला आणि शुक्रवारी नवे आदेश जारी केले. या आदेशाची प्रत सोमवारी (दि. 5) संबंधित यंत्रणेला प्राप्त झाली. त्यामुळे जानेवारीमध्ये 50 टक्क्य़ांपेक्षा जास्त नुकसान झेलणार्या शेतकर्यांना आता भरीव मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकर्यांना 17 व 25 जानेवारीच्या अकाली पाऊस व गारपिटीचा फटका बसला होता..