अमरावती- अमरावतीच्या सचिन तोरकडने 46 किलो वजन गटात ग्रीको रोमन प्रकारात बुलडाण्याच्या विकास अवजारला चीतपट करून विभागीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंबानगरीच्याच आकाश चाटेने शंभर किलो वजन गटात बाजी मारली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या यजमानपदाखाली आणि एचव्हीपीएम अमरावतीच्या सहकार्याने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील आखाड्यात झालेल्या या स्पर्धेत ५४ किलो वजन गटात यजमान संघाच्या तुषार बागडेला बुलडाण्याच्या सतीश शिंदेकडून पराभव सहन करावा लागला. ५० किलो गटात अकोल्याच्या राहुल चव्हाणने बुलडाण्याच्या योगेश हटकरवर मात केली, तर ४२ किलो गटातील चुरशीच्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या अमोल डामरेने अमरावतीच्या सुमित सपाटेला पराभूत केले.
५८ किलो वजन गटात अकोल्याच्या स्वराज मानकिटकरची सरशी झाली, तर ६३ किलो गटात अमरावतीच्या गोविंदा विरुळकरने प्रतिस्पर्धीला केवळ काही मिनिटांत आकाश दाखवले. अकोल्याच्या विशाल मिस्त्रीने ९६ किलो गटात अजिंक्यपदावर ताबा मिळवला. 85 किलो गटात आशुतोष चितळेने विजेतेपद पटकावले. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अमरावती विभाग संघात निवड झाली आहे.
स्पर्धेचे समन्वयक राज्य क्रीडा मार्गदर्शक योगेश शिर्के होते. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. संजय तीरथकर राज्य कुस्ती मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनात प्रमुख पंच प्रा. मनोज तायडे, रणवीरसिंग राहल, जितेंद्र भुयार यांनी स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेत एचव्हीपीएमच्या आखाड्यात तयार झालेल्या मल्लांनी धडाकेबाज कामगिरी करून विजेतेपद पटकावले. घरच्या वातावरणाचा त्यांनी पुरेपूर लाभ घेतला.