आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत समस्या टांगल्या वेशीला नेत्यांचे राजकारण, सामान्यांचे मरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात अज्ञात तापाने अनेकांना ग्रासले असून, अस्वच्छतेच्या प्रश्नाने कळस गाठला आहे. आधी लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीमुळे नागरी प्रश्नांवर मागील अनेक महिन्यांपासून चर्चाच झाली नाही.

अस्वच्छता विभागाच्या अकार्यक्षमतेविषयी अनेकदा चर्चा झाल्यानंतरदेखील त्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. अस्वच्छतेमुळे आजार वाढत असून, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे.
अनेक महिन्यांनंतर आमसभा झाल्याने त्यांच्या प्रभागातील समस्या रेटण्याची संधी नगरसेवकांना होती. मात्र, सदस्यांना नागरी समस्यांवर चर्चा करण्याची संधीच मिळू नये, याबाबत नियोजनबद्ध बैठक महापौरांकडून घेण्यात आली. शिवसेनेकडून एका महिन्यात विरोधी पक्षनेता बदलल्याने महापालिकेत राजकीय पडसाद उमटले आहेत.
मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे महापालिकेत प्रतिनिधित्व करणारे दिगंबर डहाके यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, प्रवीण हरमकर यांना विरोधी पक्ष नेते करण्याबाबत संपर्क नेते आनंदराव अडसूळ यांचे पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे.
प्रवीण हरमकर यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी दिगंबर डहाके यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडून आलेल्या पत्राची शहानिशा करण्याबाबत मुद्दा लावून धरण्यात आला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर या विषयावर निर्णय घेतला जावा, अशी विनंती डहाके यांच्याकडून करण्यात आली.

सदस्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
नागरी प्रश्नांवर चर्चा करता आमसभा स्थगित करण्याच्या महापौर रिना नंदा यांच्या निर्णयावर अनेक सदस्यांकडून सभागृहाबाहेर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. शहरात डेंग्यूची साथ, अस्वच्छतेने कळस गाठला असताना सभागृहात चर्चा का टाळण्यात आली, असा प्रश्नदेखील नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला. आमसभा स्थगित निर्णयाने अनेकांना धक्कादेखील बसला.
आणखी आढावा बैठक
शहर स्वच्छता आरोग्याबाबत महापालिकेत घेतल्या जाणाऱ्या बैठकांवर बैठका चर्चेचा विषय ठरला आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असताना स्वच्छतेचे तीनतेरा का वाजले आहेत, असा प्रश्न आहे. महापौर आयुक्तांकडून संयुक्त बैठक घेतल्यानंतर मंगळवारी पुन्हा महापौर नंदा यांच्या कक्षात आढावा घेण्यात आला.
गोंधळ नसताना तलवार म्यान
शिवसेनाविरोधी पक्ष नेतेपद नियुक्तीबाबत दिगंबर डहाके यांच्याकडून अाक्षेप घेण्यात आला. पत्राबाबत वरिष्ठांकडून शहानिशा केल्यानंतर विषय घेण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला मंजुरीदेखील देण्यात आली. मात्र, कोणताही गोंधळ सभागृहात झाला नव्हता. गदारोळ नसताना बैठकीची तलवार महापौरांकडून म्यान करण्यात आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.