आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - पोलिस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलिस ठाणे ‘ऑनलाइन’ होणार असून, त्यासाठी ‘क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम’ (सीसीटीएनएस) ही प्रणाली दोन जानेवारीपासून कार्यान्वित केली जाणार आहे.
पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यापासून गुन्ह्यांचा शोध घेण्यापर्यंत या संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
योजनेंतर्गत शहरातील पोलिस ठाण्यांना संगणकीय प्रणालीने जोडण्यात येणार असून, राष्ट्रीय पोलिस संशोधन संस्थेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा यासाठी वापर केला जाणार आहे. या माध्यमातूनच तक्रार दाखल करून घेतली जाईल. तक्रार क्रमांकाच्या आधारे आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही पोलिस ठाण्यातून प्रकरणाचा तपास आणि तक्रारीची स्थितीही बघता येणार आहे.
राज्यात आतापर्यंत 100 ठिकाणी सीसीटीएनएस क्लाइंट सर्व्हरच्या माध्यमातून ऑनलाइन प्रणालीची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या प्रणालीचा वापर सुरू होणार आहे. दरम्यान, पोलिसांचा रेझिंग सप्ताह दोन जानेवारीपासून सुरू होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी विविध शाळांचे विद्यार्थी आयुक्तालयाला भेट देतील. पोलिसांची काम करण्याची पद्धती विद्यार्थी समजून घेतील. तीन जानेवारीला मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस परेडचे आयोजन करण्यात आले.
नागरिकांसाठी ही परेड खुली राहील. परेड पाहण्यासाठी नागरिकांनी यावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. चार जानेवारीला प्रत्येक ठाण्यात सकाळी 10 ते सायंकाळी सहापर्यंत तक्रारदारांशी समन्वय साधण्यात येणार आहे. शिवाय चार ते सहा जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी पोलिसांच्या वापरात असलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन खुले राहील. सात जानेवारीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये मुद्देमाल वाटप कार्यक्रम होईल. आठ जानेवारीला रेझिंग सप्ताहाचा समारोप होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.