आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hockers Problem On Road In Amaravati News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यांसाठी ‘खाकी’ फ्रंटफूटवर; हॉकर्सची संख्या वाढत असल्याने रस्त्यांचा जीव गुदमरतोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी रस्त्यांना मोकळा श्वास घेता यायला हवा. मात्र, दिवसेंदिवस हॉकर्सची संख्या वाढत असल्याने रस्त्यांचा जीव गुदमरतोय. महापालिकेने अजूनही हॉकर्स आणि पार्किंग झोनच्या जागा निश्चित केल्या नाहीत. त्यामुळे हॉकर्स मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय करतात. मागील अनेक दिवसांपासून पोलिसांनी महापालिकेला हॉकर्स आणि पार्किंग झोनच्या जागा निश्चितीबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, अद्याप त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. यातच तीन मार्च 2014 ला शहर फेरीवाला समितीची स्थापना झाली असून, या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, सहायक संचालक नगर रचना, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त, महापालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच स्थानिक प्राधिकारणाचे अधिकारी सदस्य म्हणून आहेत. याच समितीला हॉकर्स झोन निश्चित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर 18 जूनला उपायुक्त बी. के. गावराने यांनी बैठक घेतली होती. या बैठकीला महापालिकेचे जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख यू. एस. गवई बाजार परवानाचे आनंद काशिकर, महाराष्टÑ स्टेट हॉकर्स फेडरेशन (आयटक)चे अध्यक्ष जे. एम. कोठारी, महाराष्टÑ स्टेट हॉकर्स फेडरेशन (आयटक)चे सचिव सुनील घटाळे, पोलिस आयुक्तालयाचे विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा, पश्चिम वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि पूर्व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय डहाके उपस्थित होते. महापालिकेकडे अद्याप शहरातील हॉकर्सची नोंद नाही. त्यामुळे महापालिकेने पुढील आठवड्यापासून हॉकर्सच्या नावनोंदणीला सुरुवात करावी, तसेच शहर फेरीवाला समितीची तातडीने बैठक घेऊन हॉकर्स झोन निश्चित करण्याचे बैठकीत ठरले. यामुळे आता लवकरच शहरातील हॉकर्स झोनचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी 23 जुलै 2013 ला तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) श्वेता खेडकर यांनी महापालिकेला हॉकर्स झोनसाठी काही जागांबाबत पोलिसांचे मत कळवले होते. मात्र, महापालिकेने अजूनही त्या जागांवर किंवा अन्य ठिकाणी हॉकर्स झोनची निर्मिती केलेली नाही. वास्तविक, हॉकर्स झोन तयार नसल्यामुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. याचा ताण वाहतूक पोलिसांवर पडतो आहे. त्यामुळेच शहरात वाहतुकीचे तीनतेरा झालेले दिसत आहे.
हॉकर्सची नोंदणी आणि ओळखपत्र आवश्यक
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे तसेच हॉकर्सला जागा देण्यासाठी हॉकर्स झोन तयार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच आम्ही बैठक घेतली. हॉकर्सची नावनोंदणी आणि त्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असल्यामुळे बैठकीत तसा निर्णय घेऊन महापालिकेला कळवले आहे.असे बैठकित ठरले असल्याचे बी. के. गावराने पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांनी सांगितले.
हॉकर्स झोनसाठी पोलिसांचा येथे होकार
  • नागपुरी गेट ते असोरिया पेट्रोलपम्प
  • शेगाव नाका ते शेगाव गावाकडील मार्ग
  • कंवरनगर भागातील महानुभाव आश्रम ते सर्व्हिस गल्लीकडील मार्ग
  • यशोदानगर ते दस्तुरनगर मार्ग
  • शासकीय तंत्रनिकेतन ते शेगाव नाका मार्गावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी.
  • अमरावती तहसील ते पोस्ट आॅफिस (सायंकाळी सहानंतर)
पार्किंग झोन निश्चित झाल्यास प्रश्न सुटेल
हॉकर्स व्यवसायासाठी रस्त्यावर येत असल्यामुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे हॉकर्सवर कारवाई करतो. मात्र. त्यांनीही व्यवसाय कोठे करावा, हा प्रश्न पुढे येतो. म्हणूनच महापालिकेने लवकर झोन निश्चित करावे. पार्किंग झोनबाबत निर्णय घ्यावा. पे अँड पार्क झाल्यास वाहनांची सुरक्षितता वाढेल. वाहनचालकांना हक्काची जागा मिळेल, या कामामध्ये महापालिकेस पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहणार आहे.
- डॉ. सुरेश मेकला, पोलिस आयुक्त.