आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्म्या हॉस्पिटल्समधून ‘ते’ झालेत गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसलेल्या व्यक्तींकडून हॉस्पिटल्समधील रुग्णांना सलाइन, इंजेक्शन टोचले जाते. त्यांच्यावर उपचार केले जातात. याबाबत ‘दिव्य मराठी’ने रविवारी प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर अमरावतीच्या वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. ज्या हॉस्पिटल्समध्ये असे अप्रशिक्षित व्यक्ती कार्यरत होते, ते सर्व मुलं-मुली वृत्त प्रकाशित होताच संबंधित हॉस्पिटल्समधून दिसेनासे झालेत.

शहरातील सुमारे 13 हॉस्पिटल्समध्ये ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशन केले. यात जेमतेम दहावी, बारावी, बी.ए., बी.कॉम., आयटीआय झालेले मुलं-मुली रुग्णांना इंजेक्शन, सलाइन टोचताना आढळले. काही जण डॉक्टरांशी सल्लामसलत न करताच रुग्णांना औषध, गोळ्या घेण्याचा सल्ला देत होते. हा प्रकार उघडकीस येताच संबंधितांमध्ये खळबळ उडाली. रविवारी 13 पैकी निम्म्यावरील हॉस्पिटल्समधून असे मुलं-मुली दिसेनाशी झाली होती. काहींनी त्यांना केवळ स्वागत कक्ष किंवा कार्यालयात बसवून ठेवले होते. या प्रकाराची गंभीर दखल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अमरावती शाखेनेदेखील घेतली आहे. शाखेचे अध्यक्ष डॉ. ए. टी. देशमुख यांनी असा प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे. प्रसंगी काही हॉस्पिटल्सची आयएमएकडून आकस्मिक पाहणीही होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

वैद्यकीय शिक्षणाचा गंधही नसलेल्या व्यक्तींकडून रुग्णांवर असे उपचार होत असतील, तर ती गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया अमरावती शहर पोलिसांनी व्यक्त केली. असा कोणताही प्रकार आढळल्यास व रितसर तक्रार दाखल झाल्यास फौजदारी कारवाईदेखील करता येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

तर प्रखर विरोध करणार
अप्रशिक्षित व्यक्तींकडून रुग्णांवर उपचार होत असतील, तर ही बाब गंभीर आहे. संबंधित डॉक्टरांनी हा प्रकार थांबवावा; अन्यथा सेना स्टाइलने त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा युवासेनेचे बडनेरा प्रमुख राहुल माटोडे यांनी दिला.