आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहात विद्यार्थ्यांचे पाण्यातच जेवण, समस्या जाणून घेण्यासाठी युवा सेनेनी दिली अचानक धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गाडगेनगर परिसरातील ‘पिवळी बिल्डिंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले आदिवासी हॉस्टेल गळत असल्याने विद्यार्थ्यांसाठीच्या रूम, व्हरांडा, मेस सर्वत्र पाणी पसरले आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी येतो; मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे राहावे लागते, असा आरोप करत युवा सेना पदाधिकार्‍यांनी हॉस्टेलवर धडक दिली व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. या पाश्र्वभूमीवर युवा सेनेच्या नेतृत्वात आदिवासी आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि. 24) तोडफोड आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युवा सेनेचे शहरप्रमुख पराग गुळदे यांनी दिला आहे.
युवा सेनेचे शहरप्रमुख पराग गुळदे व प्रवक्ता गोपाल राणे यांनी बुधवारी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेसमध्ये पाणी व अस्वच्छता पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक खोलीत पाणी गळत आहे. पिण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी राहायचे कसे, या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष का जात नाही, असा सवाल युवा सेनेने उपस्थित केला आहे. प्यायला शुद्ध पाणी नाही, परिसरात घाण पसरली आहे. पाणी पसरलेल्या मेसमध्येच विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. तेथेच स्वयंपाकाची व्यवस्था आहे. हॉस्टेल गळतेय याची माहिती उपलब्ध झाली होती. याबाबत तत्काळ उपाय-योजना करण्यात येतील, त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. असे वसतिगृहाचे गृह प्रमुख गिरीष पोळ यांनी स्पष्ट केले.