आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर ग्रॅम धान्यात जगायचे कसे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अन्न सुरक्षा योजनेतून प्रतिव्यक्ती एका वेळच्या जेवणासाठी शंभर ग्रॅम धान्याचे परिमाण ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये कसे पोट भरायचे, असा प्रश्न उपस्थित करीत धान्य गोदामातच आंदोलकांनी चुली मांडून भाकरी थापल्या. कुचकामी अन्न सुरक्षा योजनेच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने विलासनगरातील शासकीय धान्य गोदामामध्ये सोमवारी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. हे अन्न मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे नगरसेवक प्रा. प्रदीप दंदे यांनी स्पष्ट केले.
रिपाइंच्या नेतृत्वात शेकडो नागरिक सकाळी 11 वाजताच्या सुमारास शासकीय धान्य गोदामात शिरले. गोदामात चुली मांडून सोबत आणलेले शंभर ग्रॅम धान्यापासून चिमूटभर भात आणि दोन पोळ्या आंदोलक महिलांनी तयार केल्या. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती मिळणारे धान्य र्शमिक वर्गाच्या दृष्टीने अपुरे असल्याचे याद्वारे आंदोलकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. दरमहा प्रतिव्यक्ती एका वेळच्या जेवणासाठी 35 ग्रॅम गहू, 65 ग्रॅम तांदूळ मिळणार आहे. एका व्यक्तीच्या एका वेळच्या जेवणाकरिता मिळणारे एवढे धान्य अपुरे असून, त्यात लहान मुलाची भूकदेखील भागणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. अन्न सुरक्षा योजना म्हणजे सामान्य नागरिकांची थट्टा असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या वेळी महिलांनी दिल्या.
शासकीय धान्य गोदामामध्येच आंदोलकांनी चुली पेटवल्याने तेथील कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कर्मचार्‍यांनी गाडगेनगर पोलिसांना पाचारण केले. विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदूरकर, तहसीलदार शरयू आडे यांनी प्रा. प्रदीप दंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र, कोणताही तोडगा त्यांना काढता आला नाही. अखेर पुरवठा अधिकार्‍यांनी तेथून काढता पाय घेतला. आंदोलनात नगरसेवक प्रा. प्रदीप दंदे, गजानन वानखडे, ओमप्रकाश बनसोड, रणजित चव्हाण, संतोष खंडारे, गौतम वानखडे, गजानन ढवळे, राजू पाटील, लीला गेठे, दुर्गा कोकाटे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. अखेर गाडगेनगर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
अर्धपोटी ठेवणारी योजना
अन्न सुरक्षा योजना अर्धपोटी ठेवणारी आहे. दिवसाला एका वेळी केवळ 50 ते 100 ग्रॅम धान्य मिळणार आहे. एवढय़ाशा धान्यामध्ये जेवण कसे होईल? दोन महिन्यांचे धान्य देण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी दिले आहे. प्रा. प्रदीप दंदे, नगरसेवक तथा नेते, रिपाइं (आठवले).
दोन महिन्यांपासून धान्य गोदामातच पडून
विलासनगर परिसरातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्य मिळाले नसल्याची बाब आंदोलनादरम्यान उघडकीस आली. गोदामामध्ये पडून असतानाही पुरवठा विभाग धान्य देण्यास तयार नसल्याने या वेळी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दोन महिन्यांपासून धान्य न देणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी या वेळी आंदोलकांनी लावून धरली.
केवळ 50 हजार लाभार्थी
महाराष्ट्रातील सात कोटी जनतेला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, 28 लाख लोकसंख्येच्या अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी संख्या केवळ 50 हजार दर्शवण्यात आली आहे. जिल्ह्यात गरिबांची संख्या एवढीच आहे का, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. पूर्वीच्या योजनेत अधिक धान्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत होता. केंद्र शासनाने आणलेली अन्न सुरक्षा योजना फसवी असल्याचे रिपाइंच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.