आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट स्पर्धा: ‘एचव्हीपीएम अमरावती’ने दिली विजयी सलामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वेदांत जाजू अन्य सहकारी गोलंदाजांच्या धारदार माऱ्यामुळे अमरावतीच्या एचव्हीपीएम क्रिकेट क्लबने नागपूरच्या सफायर क्रिकेट क्लबचा आठ गड्यांनी सफाया करून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने आयोजित स्व. शरद भाके स्मृती १३ वर्षांखालील आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या टी-२० क्रिकेट स्पर्धेत अमरावतीने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् ‘सफायर’चा १४ षटकांत ३६ धावांत सफाया केला. एचव्हीपीएमच्या गोलंदाजी अशी काही धारदार होती, की त्यांच्यापुढे उभे राहण्याचे धारिष्ट्य केवळ तेजसने केले. त्याने १४ धावांची खेळी केली. उर्वरित एकाही फलंदाजाला दुहेरी आकड्यातील धावसंख्या गाठता आली नाही. अमरावतीचा मध्यमगती गोलंदाज वेदांत जाजूने भेदक मारा करून तीन षटकांत आठ धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाज तंबूत धाडले. लेग स्पिनर मल्हार जाेशीने तीन षटकांत ११ धावांत दोन फलंदाजांना परत पाठवले. ऑफ ब्रेक शिवम कराडेने तीन षटकांत १४ धावा देत दोन फलंदाजांचा बळी घेतला, तर प्रज्ञेश गोरटेने एका षटकात एक धाव देत एक फलंदाज बाद करून सफायरचा डाव संपुष्टात आणला.
प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या एचव्हीपीएम क्लबने सात षटकांत दोन फलंदाज गमावून ३७ धावांचे विजयी लक्ष्य गाठले. आदित्य यादवने तीन चौकार खेचून नाबाद १९ धावा केल्या, तर निशांत रुईकरने दोन चौकारांसह १२ धावांची आकर्षक खेळी केली. रोहित चांडकने नाबाद तीन धावा काढून संघाचा विजय साकारला.

योजनाबद्ध खेळाचा झाला सकारात्मक परिणाम
अमरावतीचा क्रिकेट संघ खेळपट्टीचे स्वरूप ओळखून योजनेनुसार खेळल्यामुळेच त्यांना हे यश मिळवता आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरला. दान पदरी पडल्यानंतर लगेच एचव्हीपीएमच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकाळच्या थंड रम्य वातावरणात गोलंदाजांचे चैतन्य कायम राहिल्याने यशाचा मार्गही सोपा झाला.
गोलंदाजी करण्याचा निर्णय ठरला योग्य
एचव्हीपीएमने सकाळी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय संघातील चारही प्रमुख गोलंदाजांनी सार्थ ठरवत अचूक दिशा टप्प्याने मारा केला. या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळेच ‘सफायर’च्या फलंदाजीवर शेवटपर्यंत दडपण कायम राहिले. त्यांना एकाही गाेलंदाजाने स्वैर फटकेबाजी करण्याची मुभा दिली नाही. वेदांत जाजू, मल्हार जोशी, शिवम कराडे, प्रज्ञेश गोरटे यांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावली.
बातम्या आणखी आहेत...