आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज भासल्यास इतर कामांचेही ‘ऑडिट’ चंद्रकांत गुडेवार यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात महापालिकेने तयार केलेल्या काही रस्त्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल सदोष आल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा सीमारेषेतील इतर बांधकामांचेही ऑडीट करता येईल, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली आहे.
नॅशनल हायवे अथाॅरटी ऑफ इंडीया (न्हाई), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी) अशा सरकारी विभागांमार्फत अमरावतीत बरीच कामे झाली आहेत. त्या कामांची गुणवत्ता तपासणी व्हावी, असे नगरसेवकांना वाटत असेल तर त्यांनी तशी मागणी नोंदवावी.
पुढील कारवाई करुन घेणे, ही माझी जबाबदारी आहे, असेही गुडेवार यांनी स्पष्ट केले. फक्त त्यासाठीची रक्कम मात्र मनपाला भरावी लागणार असून तपासणीअंती कामे सदोष अाढळल्यास थेट कारवाई करता तशी शिफारस मात्र त्या-त्या विभागाला पाठवावी लागणार आहेत.

मनपाच्या पाच कामांचा गुणवत्ता पडताळणी अहवाल अलिकडेच आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी मिळवला आहे. या विषयावरुन गेल्या आमसभेत चांगलेच रण माजले. दरम्यान नगरसेवकांनीही त्याच आशयाचा प्रस्ताव पारित करुन अयोग्य काम होण्याला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, असा ठराव पारित केला. नगरसेवकांची ही खेळी डॉ. देशमुख यांच्या मागणीला शह देणारी असून आम्ही सर्व शहराबाबत किती दक्ष आहोत, हे दाखवणारी आहे.

या चर्चेदरम्यान काहींनी इतर कामांचीही गुणवत्ता तपासणी का नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला पुरक माहिती देताना आयुक्तांनी मनपा हद्दीतील कोणत्याही बांधकामाची तपासणी गुणवत्ता पडताळणी करण्याचे अधिकार मनपाला आहेत, अशी जोड दिली. स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, नगरसेवक प्रदीप बाजड, प्रदीप दंदे, अविनाश मार्डीकर आदिंनी हा विषय मांडला होता.

सोलापुरात मी हे केले आहे
महापालिकेच्या सिमेत होणाऱ्या विकासात्मक कामांची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार मी सोलापुरात वापरला आहे. त्यामुळे तेथील एका लोकप्रतिनिधीला अडचणही झाली होती. मात्र मी तमा बाळगली नाही. वेळ आल्यास येथेही तसेच करता येईल. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, मनपा.