आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाकडून दोन देशी कट्टे जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेपुढे (पूर्वार्शमीचे विमवि) कमरेला देशी कट्टा लटकवून संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या युवकाला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी (दि. 24) रात्री पकडले. घरझडती घेतली असता, घराच्याच बाजूला दुसरा कट्टा जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. शनिवारी त्या युवकाला न्यायालयात हजर केले, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

इम्रान मिर्झा बेग ऊर्फ कालू मुस्ताक मिर्झा बेग (25 , रा. हबीब नगर क्रमांक 2) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तो कठोरा नाका परिसरात कमरेला गावरान बनावटीचे पिस्टल लटकवून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला शुक्रवारी सायंकाळी मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक परिसरात दबा धरून बसले. रात्री विमवि महाविद्यालयापुढील पादचारी मार्गाने तो युवक येत होता. या वेळी पोलिसांनी त्याला पकडले.

पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल जप्त केली. काडतूस जवळ नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी इम्रानच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घराबाहेर आणखी एक देशी कट्टा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी इम्रानविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड, संतोष शिखरे, ओमप्रकाश देशमुख, दीपक र्शीवास, महेंद्र गावंडे आदींनी केली आहे. देशी कट्टे कोणाकडून खरेदी केले, कशासाठी खरेदी केले, काडतूस कुठे आहे आदी बाबी पोलिसांना तपासायच्या आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले.

घरात चोरी झाली म्हणून देशी कट्टा..
देशी कट्टा बाहेरून आणला असून, त्यासाठी दहा हजार रुपये दिले होते. घरात एकदा चोरी झाली होती. तेव्हापासून आपण देशी कट्टा बाळगत असल्याचे इम्रानने पोलिसांना सांगितले. अडीच महिन्यांपूर्वी देशी कट्टय़ाची खरेदी केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.