आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In The Tug Of War For The Post Of Speaker Of Nationalist Corporation

महानगरपालिकेच्‍या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षांतील सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रिक्त होणार्‍या आठ जागांवर तेवढेच सदस्य या महिन्यांत होणार्‍या आमसभेतून पाठवली जातील. सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अंतर्गत राजकारणही तापले आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यांच्या जागी पक्षीय बलाबलानुसार नव्याने आठ जणांची निवड केली जाणार आहे. निवृत्त होणार्‍यांमध्ये छाया अंबाडकर, राजेंद्र महल्ले, नूतन भुजाडे, इमरान अशरफी, ममता आवारे, दिगंबर डहाके, प्रा. प्रदीप दंदे, दीपमाला मोहोड या सदस्यांचा समावेश आहे.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील करारानुसार, स्थायी समिती सभापतिपद येत्या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीकडे राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षातील दावेदारांची संख्या वाढत असून, माजी सभापती चेतन पवार, नगरसेविका जयर्शी मोरे, रिना नंदा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार, यावर सभापतिपदाची निवडणूक अवलंबून आहे. आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये लागल्यास विद्यमान सभापती सुगनचंद गुप्ता यांना सहा महिन्यांकरिता मुदतवाढ मिळेल, तर मार्च महिन्यात लागल्यास सभापतिपदाची निवडणूक अटळ आहे.
तिकडी फुटणार का?
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिकडी प्रसिद्ध आहे. यापैकी एकाला सभापतिपद मिळावे म्हणून रणनीतीदेखील आखली गेली. मात्र, प्रथमच महिलेला स्थायी समिती सभापतिपद का मिळू नये, अशा चर्चेनेही फेर धरला आहे. नगरसेविका जयर्शी मोरे आणि रिना नंदा यांची नावे सभापतिपदासाठी पुढे येत आहेत. महिलेला सभापतिपद मिळाले, तर तिकडीला प्रथमच धक्का बसेल. मात्र, सर्वाधिकार राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्याकडे आहेत. ते काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
स्थायी समितीत सदस्यत्वासाठी बहुजन समाज पक्षामध्ये वाद
बहुजन समाज पार्टीच्या दीपमाला मोहोड स्थायी समितीतून निवृत्त होतील. त्यामुळे एका जागेसाठी नाव पाठवण्याचे अधिकार गटनेत्याला आहे. बसप गटनेत्याचा वाद निकाली काढण्यासाठी विशेष आमसभा बोलावण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.