आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increase Police Security At Amravati News In Marathi

शहरात दहा ठिकाणी मोबाइल पोलिस ठाणे, येथे उभ्या राहणार कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागरिकांना तत्पर आणि तत्काळ पोलिसांची मदत मिळाल्यास अनेक घटना टाळल्या जाऊ शकतात. या उद्देशाने शहर पोलिसांनी नागरिकांच्या सोयीकरिता आता चौकाचौकात मोबाईल पोलिस ठाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी दहा नव्या कार मंजूर झाल्या असून,त्यापैकी पाच कार पोलिस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाची सुरवात भारतीय प्रजासत्ताक दिनी होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह घरात एकटे राहणाऱ्या महिला, ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाईल पाेलिस ठाण्यांमुळे आता कमीत कमी वेळेत पोलिस नागरिकांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. शहर पोलिसांना यासाठी दहा नव्या कोऱ्या कार मिळणार असून, त्यांपैकी पाच कार दाखल झाल्या आहेत. प्रत्येक कारसाठी शहरातील एक परिसर ठरवला आहे. त्या कारमध्ये पाच पोलिस राहणार आहेत. या कारमध्येच नागरिक पोलिसांची मदत घेऊ शकतात किंवा मौखिक तक्रारसुद्धा करू शकतात. या कार २६ जानेवारीपासून शहरात कार्यरत होणार आहेत.
पोलिसांची तत्काळ मदत मिळाल्यास अनेक घटना टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळेच नागरिकांना तातडीने मदत करता यावी म्हणून शासनाने पोलिसांना अतिरिक्त वाहन देण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयाप्रमाणे अमरावती आयुक्तालयात दहा कार मंजूर झाल्या असून, पाच कार अमरावती पोलिसांच्या ताफ्यात पोहोचल्या आहेत. या कारमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी चालकासह चार, असे पाच पोलिस २४ तास कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे या वाहनाला आयुक्तालयातील दहा ठिकाणी उभे करण्यात येणार आहेत.
शहरातील चार्ली बंद
शहरातसध्या ३० पुरुष चार्ली (१५ जोड्या) दुचाकीने गस्त घालत आहेत. मात्र, आर्टीका कार कार्यरत झाल्यानंतर पुरुष चार्लींची गस्त बंद होणार आहे. महिला चार्लीची दुचाकी गस्त मात्र कायम राहणार आहे. परिसरात होणाऱ्या घटनांस्थळी जाऊन मदत करण्यासोबतच राँग साइड, ट्रीपल सीट स्टंटबाज वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश या पथकाला दिले आहेत,अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त (प्रशासन) वा. घ. सूर्यवंशी यांनी दिली आहे.

नागरिकांना तत्काळ सेवा देण्याचा प्रयत्न
-आयुक्तालयाच्याहद्दीतील नागरिकांनी मदत मागितल्यानंतर कमीत कमी वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचावेत, हाच आमचा प्रयत्न आहे. नवीन कार ठरावीक ठिकाणी उभ्या ठेवणार असल्यामुळे आता ‘रिस्पॉन्स टाइम’ कमी होईल, त्यामुळे आम्ही नागरिकांना तत्काळ सेवा देऊ शकणार आहे. डॉ.सुरेशकुमार मेकला, पोलिसआयुक्त,अमरावती.