आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट फेरीने चेतवले स्वातंत्र्याचे स्फुलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बुलेटप्रेमींनी उत्स्फूर्तपणे फेरी काढली होती. राजकमल चौकातून निघालेल्या या फेरीने शहरातील विविध भागांत फेरफटका मारत सार्‍यांचेच लक्ष वेधले.
डोक्यावर भगवा फेटा, हातात तिरंगा आणि शिस्तबद्ध निघालेली ही फेरी राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक मार्गे इर्विन चौकात आल्यावर त्यांनी ‘भारत माता की जय..’, विश्व विजयी तिरंगा प्यारा.., ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देण्यास प्रारंभ करताच उपस्थितांनीही त्यांना जोरदार प्रतिसाद दिल्याने परिसर दणाणून गेला होता. या रॅलीमध्ये तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या फेरीमध्ये प्रत्येक चौकामध्ये अमरावतीकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. फेरीमध्ये चिमुकलेही सहभागी झाले होते. त्यांच्या हातातील छोटे ध्वज आणि त्यांच्या घोषणांनी सार्‍यांचे लक्ष वेधले.
मालवीय चौक, इर्विन चौक परिसरात फेरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वातंत्र्याचा आनंद लुटतानाच एकात्मता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी या फेरीचे आयोजन करण्यात येते. यात अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून, कुणालाही याचे खास आमंत्रण दिले जात नसल्याची माहिती फेरीत सहभागी तरुणांनी दिली आहे. परस्परातील मतभेद, वाद-विवादांना फाटा देत फेरीत सहभागी होणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात या फेरीत महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी होतील, असा विश्वास फेरीत सहभागी तरुणांनी व्यक्त केला आहे. देशभक्तीसोबतच सामाजिक जागृतीचा संदेश दिला जात असल्याने सर्वांनीच याचे मनापासून स्वागत केले.