आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराघरांत पुन्हा पोहोचणार ‘टपाल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मरगळ झटकत पुन्हा एकदा घरा-घरात पोहचण्याचा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. खात्याच्या विविध योजनांबाबत विभागाचे कर्मचारी बुधवारपासून (दि. नऊ) जिल्हाभर जनजागरण करणार आहेत. ‘इंडियन पोस्टल डे’निमित्त देशभर हा कार्यक्रम आखण्यात आला असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.

यानिमित्त राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला दिवस ‘वर्ल्ड पोस्टल डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे. टपाल खात्याच्या विविध कार्यालयांमध्ये ग्राहक सभा आयोजित करणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, नवीन योजनांबाबत माहिती देणे, हा या बैठकांचा उद्देश आहे. गुरुवारी (दि. 10) ‘बचत बँक दिवस’ साजरा केला जाईल. इतर वित्तीय संस्थांच्या तुलनेत टपाल खात्याच्या योजना कशा चांगल्या व फायदेशीर आहेत, हे या बैठकांमधून समजावून सांगितले जाईल. शुक्रवारी (दि. 11) ‘मेल डे’ आहे. त्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयांमध्ये बोलावून यंत्रणेची माहिती दिली जाईल.

त्यानंतरच्या दिवशी टपाल तिकिटाच्या संग्रहाचा छंद जपणार्‍यांची कार्यशाळा घेतली जाईल. सोमवारी (दि. 14) शहर व ग्रामीण स्तरावर टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल. मंगळवारी (दि. 15) सप्ताहाचा शेवट असेल. या दिवशी कार्यशाळा आणि मेळाव्यांचे आयोजन करून सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. ‘इंडियन पोस्टल डे’निमित्त पुन्हा एकदा टपाल कर्मचार्‍यांमध्ये उत्साह संचारला आहे.

विश्वव्यापी दळणवळण
राष्ट्रीय टपाल दिनासोबतच बुधवारी जागतिक टपाल दिवसही साजरा केला जातो. जगभरात दळणवळणासाठी आजही टपाल सेवेचाच वापर केला जातो. यानिमित्ताने युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या जागतिक अध्यक्षांनी जगभरातील सहा लाख टपाल कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही यंत्रणा अधिक बळकट व लोकाभिमुख करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, गेल्या वर्षभरात जगभरात 350 दशलक्ष पत्रांचे वितरण केले गेले.