आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrial Ministry Sanctioned 116 Crores For Industrial Area

औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी उद्योग मंत्रालयांने केले 116 कोटी रूपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहत व नांदगावपेठ येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या विकासासाठी उद्योग मंत्रालयाकडून 116 कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदिल देण्यात आला आहे.
यामुळे या क्षेत्राचा विकास होऊन मोठे उद्योग शहरात येण्याची आशा निर्माण झाली आहे. शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी आणि एमआयडीसी क्षेत्राचा विकास व्हावा, या साठी आमदार रावसाहेब शेखावत यांनी अमरावती विभागीय इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसह उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. मोर्शी रस्त्यावरील विस्तारित ले-आऊटमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी व टेक्स्टाइल पार्कच्या टी जंक्शनला विकसित करण्यासाठी 17 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. एवढय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याबद्दल अमरावती विभागीय इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, सचिव सुरेंद्र देशमुख, उपाध्यक्ष दिलीप अग्रवाल, अनिल माधोगढिया, पुरुषोत्तम बजाज यांनी आमदार शेखावत यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.


निधी मंजुरीमुळे आता या कामांना मिळणार गती
शहरातील एमआयडीसी क्षेत्रामध्ये रस्त्यांची कामे करण्यासाठी दोन कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले असून, या कामाच्या निविदा अंतिम मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. याच वसाहतीमधील प्लॉट क्रमांक सी 37 ते 40 लगत नालीचे बांधकाम करण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत. अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रामध्ये शेड भागात रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी 89 लाख रुपये मंजूर झाले असून, या कामाच्या निविदा 14 फेब्रुवारीला उघडण्यात येतील. रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे या पायाभूत सुविधांसाठी या क्षेत्रात 37 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.