आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा मार: श्रावणातील सणासुदीत भाजीपाला तडकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पाऊस, पूर व सोसाट्याच्या वार्‍यामुळे भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात भाजीपाला तडकला आहे. बाजारात आवक कमी झाल्याने सांभार 120 रुपये प्रति किलो किरकोळ दराने विकला जात असल्याने ताटातील भाज्याही बेचव झाल्या आहेत. बाजारात बहुतांश भाज्यांचे दर 40 ते 120 रुपये प्रति किलो असून जनसामान्यांना भाजीपाल्याची खरेदी खिसा बघूनच करावी लागत आहे.

मागील दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वार्‍यामुळे जिल्ह्यात पिकांसह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ठोक बाजारात भाजीपाल्याची आवकही मंदावली आहे. दरम्यान, र्शावण सुरू झाल्यामुळे महिलांचे व्रत-वैकल्य, पूजा-अर्चा सुरू झाल्या आहेत. सणासुदीचेही दिवस असल्यामुळे भाजीपाल्याची मागणी या दिवसांत वाढत असते. परंतू, मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही पावसाने फटका दिल्यामुळे जनसामान्यांची भाजीपाला खरेदी किलोवरून पावभर्‍यावर आली आहे. दरम्यान, फुलकोबी, काकडी, भेंडी, पत्ताकोबी, बरबटी, सिमला मिरची, हिरवी मिरची, सांभार, लसूण, अद्रक, टमाटर, ढेमसे, पालक, कारले आदी भाज्यांचे दर 40 ते 120 रुपये प्रति किलो दर पर्यंत गेले आहेत. भाजीपाल्याचे दर कडाडल्यामुळे पिशवी घेऊन खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना पावभर भाज्या खरेदीकरून प्लास्टिकच्या पन्नीवरच समाधान मानावे लागत आहे.