आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीवर माओवादी नेते मारतात डल्ला, जहाल माओवादी गोपीने पोलिसांसमोर दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- चळवळीच्या नावाखाली सुरू असलेल्या माओवाद्यांच्या लढ्याच्या पहिल्या रांगेतील सैनिकाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. चळवळीसाठी उद्योजक आणि गर्भश्रीमंतांकडून वसूल करण्यात येणाऱ्या खंडणीवर शहरी भागातील माओवादी नेते डल्ला मारतात. चळवळीच्या नावावरील मलई नेते खातात आणि परिस्थितीशी झगडणाऱ्या शिपायाच्या (नक्षली) वाट्याला केवळ भाकरीचे तुकडे आणि खरकटं येतं आहे, असा गौप्यस्फोट आत्मसमर्पित जहाल नक्षली गोपी याने केला.
गोपी उर्फ निरंगसाय मडावी याने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यानंतर त्याने नक्षलविरोधी अभियानच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहितीत अनेक बाबींचा खुलासा केला, असा दावा नक्षलविरोधी अभियानच्या (एएनओ) नागपुरातील मुख्यालयाने केला आहे. गोपी हा मूळचा कोरची तालुक्यातील असून, घरातील कलहामुळे वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने घर सोडले. त्या वेळी नागपूरला जाऊन छोटे-मोठे काम करावे, असे त्याला वाटायचे. परंतु, नागपूरच्या मार्गात असताना गडचिरोलीत भेटलेल्या एका मित्रामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलले.
मित्राच्या सोबतीने २००२ मध्ये तो नक्षल चळवळीत दाखल झाला. सुरुवातीला कोरची, खोब्रामेंढा आणि कुरखेडा दलमचा सदस्य म्हणून त्याने काम केले. हिंसक कारवाया करण्यात अत्यंत निपुण आणि दिलेली जबाबदारी चुकता पार पाडत असल्याने त्याला दलम कमांडर म्हणून बढती मिळाली. एवढेच नव्हे तर अल्पावधीतच तो विभागीय समितीचा सदस्यदेखील झाला होता.
संपर्कासाठी ‘कोडवर्ड’
एकमेकांसोबतसंपर्क करण्यासाठी ‘कोडवर्ड’चा वापर करण्यात येतो तसेच वायरलेस यंत्रणासुद्धा सोबत असते. सध्या केंद्रीय कमिटीचा सदस्य असलेल्या मिलिंद तेलतुंबडेला भेटायला पुण्याकडील काही लोक जंगलात येतात, असा खुलासा गोपीने केला.
चळवळ भरकटली
गरीबआदिवासींची व्यापारी, ठेकेदारांची लूट थांबवण्यासाठी नक्षल चळवळ सुरू झाली होती. मात्र, कालांतराने ही चळवळ भरकटली. निरपराध नागरिकांच्या हत्या आणि उद्योगपतींकडून खंडणी वसूल करण्यावरच त्यांचा आता भर आहे. ही बाब आदिवासींच्याही लक्षात आली असून, त्यांनाही आता विकास हवा आहे, अशी माहिती गोपीने पोलिसांना दिली.
वरिष्ठ सदस्य पोहोचवतात स्फोटके
नक्षलवादीगावात आल्यावर त्यांचा गणवेश, त्यांचे नाच-गाणे पाहून आदिवासी युवक-युवती त्यांच्याकडे आकर्षित होतात. विचाराने आकर्षित होणाऱ्यांची संख्या जवळपास शून्य आहे. एकदा नक्षल्यांसोबत गेले की मग ते पोलिसांची भीती दाखवतात. कोणत्या गावात जायचे, कोणती कारवाई करायची, याचा निर्णय दोन-तीन दिवसांपूर्वी घेण्यात येतो. जीवाच्या भीतीमुळे आदिवासी पोलिसांबद्दल नक्षल्यांना माहिती पुरवतात. त्यानुसार नक्षलवादी योजना आखतात. पोलिसांवर हल्ला करण्यासाठी, स्फोट घडवण्यासाठी लागणारे साहित्य वरिष्ठ कमिटीच्या सदस्यांकडून पोहोचवले जाते.