आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अभिनेते मेहनत घेतात पण निर्माते प्रसिद्धी करत नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- हिंदी सिनेमाप्रमाणे दमदार प्रसिद्धी केल्यास मराठी चित्रपटदेखील 100 कोटींचा पल्ला गाठू शकेल, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिने व्यक्त केले.

प्रेक्षक वर्ग वास्तव व्यक्तिरेखांवरील चित्रपटांना पसंती देत आहे. तसे चित्रपट मराठीतूनही प्रदर्शित होत आहेत. मराठीत चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहेत. सिनेमा चांगला करण्यासाठी ते भरपूर मेहनत घेतात. मात्र, निर्माते हवी तशी प्रसिद्धी करत नसल्याने चित्रपट लोकापर्यंत जात नाही. एखादा चित्रपट 15 दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे. त्याला 30 दिवस लागत असल्याने हिंदीच्या तुलनेत आपण मागे पडत आहोत. या तांत्रिक बाबी आणि समस्यांवर तोडगा काढल्यास मराठी चित्रपट व कलाकारांना सुगीचे दिवस येतील, असेही ती म्हणाली.

जिद्द, चिकाटी बाळगल्यास यश तुमच्या दारी : वर्‍हाडी भाषेत आपली वेगळी छाप पाडणारे अमरावती येथील भरत गणेशपुरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत भरपूर नाव कमावले आहे. मात्र, त्यांच्याशिवाय इतर वैदर्भीय कलावंतांना मराठी चित्रपट वा मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही. याबद्दल रुचिता म्हणाली, येथील कलावंत लगेच हतबल होतात. त्यांनी निराश न होता भरपूर मेहनत घ्यावी. जिद्द व चिकाटीशिवाय हे शक्य होणार नाही. ज्या कलावंतांना चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, अशांनी मुंबई व पुणेकडे येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मीदेखील मालिकांमधून काम केले. ‘वीर शिवाजी’ मालिकेत सोयराबाईची भूमिका केली. ‘कालाय तस्मै नम:’ या मालिकेतही काम केले आहे. चित्रपट हे प्रभावी व्यासपीठ आहे, असे तिने नमूद केले.

अमरावतीत काम करायला आवडेल : सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीत एखादा चित्रपट तयार होणार असेल, तर त्यात नक्कीच काम करायला आवडेल, असे मत रुचिताने व्यक्त केले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित पु. ल. देशपांडे एकांकिका करंडक स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी ती अमरावतीत आली होती. टीव्हीवरील मालिका ते चित्रपटसृष्टी असा प्रवास या वेळी तिने कथन केला.