आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या अंबानगरीतही पसरला आयपीएलचा "फीव्हर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विश्वातील सर्वांत ग्लॅमरस, सुंदर आणि श्रीमंत क्रिकेट म्हणून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेटचा उल्लेख होतो. या व्यावसायिक स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले संघ यंदाही अशी काही फटक्यांची आतषबाजी करताहेत, की संपूर्ण अमरावतीकर झपाटल्यासारखे टीव्हीवर सामने बघण्यात व्यस्त दिसताहेत.

आयपीएल सुरू होऊन आता जवळ-जवळ दोन आठवडे पूर्ण होत आल्यामुळे या स्पर्धेतील रंगत चांगलीच वाढली आहे. तशा प्रेक्षकांच्याही सामने बघण्यासाठी उड्या पडत आहेत. विश्वातील दिग्गज फलंदाज आणि गोलंदाजांची देखणी कामगिरी ‘याची देही, याची डोळा’ बघण्याची संधी कोणीही गमावण्यास तयार नाही.

दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत क्रिकेटप्रेमींची चंगळ आहे. सध्या सर्वांनाच सुट्या लागल्यामुळे आयपीएलचा आनंद अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच घेत आहेत. सर्वत्र आयपीएलची चर्चा, आयपीएल बघतच नाष्टा, जेवण असे बेत रंगताना दिसत आहेत. घरी पाहुणे आले, तरी टीव्हीवर आयपीएल बघतच गप्पांचे फड रंगत आहेत. चहाच्या टपरीवर, पानठेल्यांवर, दुकानांमध्ये सर्वत्र आयपीएलचीच धूम आहे. कोणी-कशी धडाकेबाज फटकेबाजी केली, कोणी-किती बळी घेतले, चीअर लीडर्स कशा नृत्य करीत होत्या. एवढेच काय, आजच्या सामन्याला कोणकोणत्या बॉलीवूड सेलीब्रेटींनी हजेरी लावली, इथपर्यंत सर्व गोष्टी चघळल्या जात आहेत.

यामुळे ज्याने सामना बघितला नसेल, त्यालाही सामन्याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी झटपट मिळते. स्फोटक फलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी आणि कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवेल असे अॅथलेटिक क्षेत्ररक्षण या सर्वच जमेच्या आणि क्रिकेटपटूंना वेड लावणाऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी वाढल्या जात असल्यामुळे सध्या टीव्हीपुढेच क्रिकेटप्रेमींची पंगत रंगत आहे. सुट्यांमुळे बच्चे कंपनीलाही आयपीएलचा "फीव्हर' चढला आहे. टीव्हीसमोरून हटण्यास मुलेही तयार नाहीत.

विश्वातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग बघण्याचा रोमांच कोण गमावणार? हा तर आमचा उत्सवच आहे. क्रिकेट हा आपला धर्म आहे. केवळ विदेशीच नव्हे, तर आपलेही खेळाडू फक्कड खेळ करताना दिसत असल्यामुळे आमचाही उत्साह वाढतो. आपणही यांच्या प्रेमाचे खेळ करू अन् नाव कमावू शकतो, अशी प्रेरणा मिळते. त्यामुळेच आयपीएल बघण्याची संधी आम्ही सोडत नाही, अशा प्रतिक्रिया उदयोन्मुख क्रिकेटपटूंनी व्यक्त केल्या.

आयपीएल बघत विश्रांती घेण्याची सवय अमरावतीकरांना जडली आहे. शनिवार, रविवार सुटीचा दिवस म्हटला, की आयपीएल लढतींचा आनंद घेत झक्कास घरातच विश्रांती करायची. चमचमीत जेवणावर ताव मारायचा आणि कूलरच्या थंड हवेत शीतल पेयाचा स्वाद घ्यायचा, असे समीकरणच झाले आहे. त्यामुळे सायंकाळी रस्त्यांवर तशी गर्दी कमीच असते. याचे कारण झटपट आणि ग्लॅमरस क्रिकेट हेच होय.

लग्नाच्या मंडपातही झटपट क्रिकेट

लग्न म्हटले, की घाई ही आलीच. सर्वत्र कशी वर्दळ असते. पाहुण्यांची रेलचेल, मुलांचे बागडणे, तयारी कशी जोरात सुरू असते. मात्र, एका लग्नात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्यासाठी नवीनच शक्कल लढवण्यात आली होती. मोठ्या मंडपात एलसीडीवर सर्व पाहुणे, बच्चेकंपनी आयपीएल सामने बघत होती. या संधीचा लाभ घेत घरची मंडळी अगदी झटपट कामे उरकण्यात मग्न होती. यामुळे सर्वांचाच वेळ सार्थकी लागताना दिसला.