आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irvine Hospital 'No Irmajansi Exit ' Issue At Amravati, Divya Marathi

इर्विनमध्ये ‘नो इर्मजन्सी एक्झिट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा सामान्य रुग्णालयातील एखाद्या वॉर्डमध्ये आग लागल्यास रुग्णांना तेथून बाहेर पडण्यासाठी ‘इर्मजन्सी एक्झिट’चा पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हजारांवर असलेल्या रुग्णांनी इमारतीबाहेर पडायचे कसे, हा प्रश्नच आहे.

गुरुवारी रात्री बाह्य रुग्ण विभागात लागलेली आग लवकर विझवण्यात यश आले. त्या आगीच्या झळा रुग्णांपर्यंत पोहोचल्या नाहीत. मात्र, या निमित्ताने रुग्ण सुरक्षिततेचा मुद्दाही चव्हाट्यावर आला आहे. या मुद्दय़ावर रुग्णालय प्रशासन किती प्रामाणिक आहे, याचे मासलेवाईक उदाहरण येथे देता येईल. रुग्णालयाचे बांधकाम ब्रिटिश कालखंडातील असल्यानेच त्यामध्ये आपत्कालीन मार्गाची तरतूद केली नसल्याची सारवासारव रुग्णालय प्रशासनाने केली आहे. हा एक मुद्दा ग्राह्य धरला तरी, फायर एक्सटिंग्विशरचीही रुग्णालयात बोंब आहे. त्याबाबत ब्रिटिश अदमानीला आरोपीच्या पिंजर्‍यता उभे करता येणार नाही. रुग्णालयात अग्निरोधक यंत्रांची सुविधा असती, तर अग्निशमन बंबाची वाट न बघता वेळीच उपाययोजना करून शॉर्ट सर्कीटच्या ठिणगीवर नियंत्रण मिळवता आले असते. मात्र, त्या मुद्दय़ावर इर्विनची पाटी कोरी आहे.

फायर ऑडिटचा प्रस्ताव विचाराधीन : फायर ऑडिटसंदर्भातील प्रस्ताव महापालिकाकडे सादर केला. मनपाने ऑडिटसाठी तीन लाख 20 हजार 780 रुपयांची तरतूद केली. निधीच्या मंजुरीसाठी आरोग्य संचालकांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

फायर अलार्मचीही बोंब
आग किंवा तत्सम घटना घडल्यास रुग्ण, कर्मचारी, डॉक्टर्स आदींना सतर्क करण्यासाठी अलार्म आवश्यक आहे. रुग्णालय प्रशासनाला विचारले असता, फायर अलार्मची संख्या किती, हे कुणालाही सांगता आले नाही. रुग्णालयात केवळ एकच फायर अलार्म असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फायर एक्सटिंग्विशरसाठी निधी उपलब्ध
रुग्णालय सुरक्षेच्या दृष्टीने फायर एक्सटिंग्विशरसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे आरोग्य प्रशासनाकडे तो अडकून पडला आहे. तो लवकरच वापरात आणला जाईल. डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय.
04 संच बंद
34 अग्निरोधक संच
17 एकूण वॉर्ड
50-100 दाखल रुग्ण
300-500 दररोज येणारे रुग्ण

बाह्य रुग्ण विभागात गुरुवारी शॉर्ट सर्किट
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात गुरुवारी (दि. 29) रात्री शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. अग्निशमन दल व रुग्णालय प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण प्रस्थापित झाल्याने अप्रिय घटना टळली. तथापि, आपत्कालीन घटनेचा सामना करण्यासाठी इर्विनमध्ये आवश्यक सामग्री आहे का, याबद्दल शंकाच आहे. हजारांवर रुग्णसंख्या असलेल्या इर्विनमध्ये बहुतांश अग्निरोधक यंत्रे कुचकामी आहेत, तर ‘इर्मजंसी एक्झिट’चा पर्यायही उपलब्ध नाही. ‘दिव्य मराठी’ने आगीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पाहणीत ही तथ्ये पुढे आली आहेत. त्याचा हा लाइव्ह वृत्तांत..