आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाचा लढा: जनता दलाची मागणी; मंगळवारी नागपुरात मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वयाची साठ वष्रे पूर्ण असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरतर्फे ‘शेतकरी पेन्शन संघर्ष यात्रा’ काढण्यात आली आहे. त्या अंतर्गत मंगळवारी (दि. 10) नागपूर विधान भवनावर मोर्चा नेला जाईल. याच मागणीसाठी गुरुवारी (दि. 5) राजकमल चौकात प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कोल्हापूर येथून 21 नोव्हेंबरला विविध मागण्या घेऊन शेतकरी पेन्शन संघर्ष यात्रा निघाली. गुरुवारी दर्यापूरहून ही यात्रा शहरात दाखल झाली. राजकमल चौकात मोर्चा व मागण्यांबाबत पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. देशात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. काबाडकष्ट करूनही शेतकर्‍यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. त्याला कर्ज काढल्याशिवाय शेती कसता येत नाही.सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सरकार पेन्शन देते. मात्र,वृद्ध शेतकर्‍यांना कोणतेही पेन्शन देत नाही. परिणामी, वृद्घापकाळातही शेतकर्‍यांना कठीण परिस्थितीत जगावे लागते. त्यामुळे वयाची साठी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने दखल न घेतल्याने नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे, असे पदाधिकार्‍यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी या संघर्ष यात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी होण्यासाठी शेतकरी, शेतमजूर व कष्टकर्‍यांना आवाहन करण्यात आले.
डॉ. पांडुरंग ढोले, अँड. के. डी. शिंदे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सत्तारभाई सुमार, त्रिभुवन पांडे, शहराध्यक्ष मोहन खंडारे यांनी संघर्ष यात्रा व मोर्चाविषयी माहिती दिली. जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. यापुढे यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातून नागपूरला संघर्ष यात्रा पोहोचणार आहे.