आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणूसपण नाकारणारे साहित्य फेका, संमेलनाचे उद्घाटक जयंतभाई परमार यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा (ताराबाई शिंदे साहित्य नगरीतून)- माणसाचे माणूसपण नाकारणारे सर्व साहित्य हे समुद्रात फेकून दिले पाहिजे. माणसाच्या जाणिवा, त्यांचे दु:ख, दैन्य, दारिद्र्य जे साहित्य मांडते, तेच खरे विद्रोही साहित्य आहे.
परंपरावादी साहित्याने दलित, पीडित मनुष्याच्या दु:खाला कधी वाचा फोडली नाही, म्हणून अशा प्रकारच्या विद्रोही साहित्य संमेलनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उर्दू, दलित साहित्यिक जयंतभाई परमार यांनी केले. स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीमध्ये १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन परमार यांच्या हस्ते १७ जानेवारीला झाले. या वेळी ते बोलत होते.
सध्या विचारवंत सृजनवाद मांडताना दिसत आहेत. मात्र, जोपर्यंत देशात अभिजनवाद जिवंत आहे, तोपर्यंत सृजनवाद प्रस्थापित होऊ शकत नाही. हा अभिजनवाद संपवण्यासाठी बहुजनवादाची पाळेमुळे अधिक घट्ट करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
विचारपीठावर संमेलनाध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष डाॅ. डी. एम. अंभोरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, विद्रोही साहित्य-सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, माजी संमेलनाध्यक्ष श्रीराम गुंडेकर, उत्तमराव पाटील, डाॅ. अजीज नादाफ, किशोर ढमाले, सिद्धार्थ जगदेव, किशोर जाधव, शैलेंद्र सोनवणे, मुख्य निमंत्रक अॅड. जयश्री शेळके आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात अॅड. जयश्री शेळके यांनी बहुजनांच्या वेदना, समस्या मांडते ते साहित्य, ते संमेलन आमचे आहे. शोषणाविरोधात शोषितांनी उठवलेल्या आवाजाचे हे विद्रोही साहित्य संमेलन प्रतीक असल्याचे स्पष्ट करून अनेक बाबींचा ऊहापोह केला. स्वागताध्यक्ष डाॅ. डी. एम अंभोरे यांनीही मार्मिक शब्दात विचार मांडून उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ महादेवराव भुईभार, आंबेडकरवादी साहित्यिक कुमुदताई पावडे, सत्यशोधक उत्तमराव पाटील यांचा अॅड. अरुणभाऊ शेळके यांच्या हस्ते विद्रोही जीवनगौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच ‘विद्रोही दिशा’ स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.