आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये मांजाने घेतला 28 पक्ष्यांचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पतंगबाजांची हौस आणि मौज शहरातील मुक्या पक्ष्यांच्या जिवावर बेतली आहे. शहरातील काही विद्यार्थ्यांच्या मदतीने ‘दिव्य मराठी’ने केलेल्या एका पाहणीत पतंगीच्या मांजामुळे थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल 28 पक्ष्यांचा बळी गेल्याचे आढळले. बळी गेलेल्या पक्ष्यांमध्ये बहुतांश चिमण्या, पोपट आणि फ्लाय कॅचर यांचा समावेश आहे.

शहरातील बहुतांश भागात फिरून विद्यार्थ्यांच्या चमूने पतंगाच्या मांजामुळे झालेल्या परिणामांचा आढावा घेतला. यातील सर्वाधिक बळी आढळले अमरावतीहून बडनेराकडे जाणार्‍या रेल्वे ट्रॅकच्या आसपास. अमरावती रेल्वे स्थानकापासून सिपना कॉलेजपर्यंतच्या परिसरात एकूण 16 चिमण्या वेगवेगळ्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या होत्या. गाडगेनगर परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि विलासनगरात दोन पोपट मृत्युमुखी पडले होते. कंवरनगरातील एका गल्लीत चिमण्यांची दोन पिल्ले मृत्युमुखी पडलेली होती. मांजामुळे त्यांचे पंख कापले गेल्याने त्यांचा प्राण गेला असावा. अंबिकानगरातील शाळेजवळील मैदानातही एक फ्लाय कॅचर मरून पडला होता. विद्यार्थ्यांपैकी काहींना बडनेरातील जुनीवस्ती येथे दोन चिमण्या आणि मार्डी रोडवर दोन चिमण्या, वडाळी रोडवर एक किंगफिशर मरून पडल्याचे आढळले.

अधिकृत नोंद नाही : संक्रांतीच्या काळात मांजामुळे बळी जाणार्‍या पक्ष्यांची वनविभाग किंवा पक्षी निरीक्षकांकडे अधिकृत नोंद आढळली नाही. काही हौशी पक्षी निरीक्षकांनी मात्र मांजामुळे पक्ष्यांचा बळी जातो, असे नमूद केले. तथापि, दरवर्षी किती बळी जातात, याची ठाम आकडेवारी कुठेही आढळली नाही.

मान, पंख कापले जातात
मांजामुळे अनेकदा पक्ष्यांची मान किंवा पंख कापले जातात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. ग्रामीण भागातही याचे प्रमाण वाढत आहे. डॉ. गणेश वानखेडे, प्राणिशास्त्र तज्ज्ञ

आनंद घ्या, जीव नको !
संक्रांत कुणाच्या जिवावर बेतू नये. पतंगबाजीचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा, परंतु, पक्ष्यांच्या घरट्यांच्या आसपास किंवा ज्या भागात जास्त प्रमाणात पक्षी उडताना दिसतात, तेथे पतंग उडवणे टाळता येईल. यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक